गरीब विद्यार्थ्याच्या मदतीसाठी सरसावला परिसर : मदतीचा धनादेश सुपुर्द

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील करणखेडे येथील मूळ रहिवासी असणार्‍या विद्यार्थ्याच्या यकृत प्रत्यारोपणासाठी पैशांची गरज असून त्याच्या मदतीसाठी परिसर सरसावल्याचे दिसून आले आहे.

 

करणखेडे (ता. अमळनेर) येथील संतोष धोंडू पाटील हे पोटापाण्यासाठी आपल्या परिवारासह पुणे येथे वास्तव्यात आहेत. संतोष पाटील हे एका खाजगी कंपनीत वॉचमध म्हणून नोकरी करतात तर त्यांच्या पत्नी छायाताई या धुणी-भांडीची कामे करून आपल्या संसाराला हातभार लावतात. त्यांना दोन आपत्य असून मोठी मुलगी नंदिनी ही पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहे तर लहानगा राहुल हा दहावीला जातो.

 

दुर्दैवाने चि.राहुलचे यकृत निकामी झाले असून लवकर त्याचे यकृत प्रत्यारोपण न झाल्यास राहुलच्या जीवाला धोका उद्भवू शकतो असे पुण्याच्या मेडिकव्हर हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे . एकुलता लेक, घरची परिस्थिती अत्यंत दयनीय, आणि अशातच मुलाचे हे आजारपण आता काय करावे? असा यक्ष प्रश्न या परिवारापुढे उभा राहिला आहे.

 

राहुलची मोठी बहीण नंदिनी आपल्या भावाला यकृत दान देण्यास तयार झाली असून मात्र पैशांअभावी शस्त्रक्रिया रखडलेली आहे. तब्बल २१ लाख रुपयाचा खर्च या शस्त्रक्रियेसाठी होणार असून या परिवाराला एवढ्या रकमेची तजवीज करणे शक्य नसल्याने अशा अडचणीच्या वेळी राहुलचे औषधोपचार व शस्त्रक्रियेसाठी आपल्याकडूनही आर्थिक मदत व्हावी यासाठी गावातील तरुणांनी प्रथमता गावात झोळी फिरवून आर्थिक मदत संकलित केली. व तदनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून देणार्‍याने देत जावे  या नावे दि. १४ ते दि. २२ पर्यंत नऊ दिवसासाठी व्हाट्सअप ग्रुप बनवून त्या माध्यमातून राहुलच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत करण्यासंदर्भात दानशूर दात्यांना आवाहन केले. या नऊ दिवसात दानशूरदात्यांनी राहुलला आर्थिक स्वरूपात भरभरून आशीर्वाद दिले  व राहुलच्या आरोग्यासाठी परमेश्वराला साकडे घातले असून दात्यांच्या दातृत्वातून  तब्बल तीन लाखाच्या वर निधी राहुलच्या शस्त्रक्रियेसाठी प्राप्त झाला आहे.

 

दात्यांच्या दातृत्वातून प्राप्त झालेला या निधीचा धनादेश राहुलच्या आई सौ.छायाबाई संतोष पाटील व त्याला यकृत दान करून जीवनदान देणारी त्याची मोठी बहीण कु.नंदिनी यांना अमळनेरचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे साहेब व त्यांच्या अर्धांगिनी सौ.मनीषाताई शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी पी.आय. विजय शिंदे यांनी स्वतःही या परिवाराला आर्थिक मदत करून सोशल मीडियावर अशा अडचणीच्या वेळेस आर्थिक पाठबळ देऊन मदत करणार्‍या सर्व दात्यांच्या  बाबतीत  गौरवद्गार काढले.   राहुलच्या शस्त्रक्रियेसाठी दात्यांना आर्थिक मदत करायची असल्यास खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर फोन पे व गुगल पे च्या माध्यमातून मदत करू शकतात. या संदर्भात निंबा रतिभान सूर्यवंशी यांच्याशी   ९०११०५०२५५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

Protected Content