आयएमआर महाविद्यालयात राष्ट्रीय प्राध्यापक गुणवत्ता विकास कार्यक्रम संपन्न

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील खान्देश कॉलेज एजुकेशन सोसायटीच्या इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च संस्थेत उच्च शिक्षण आणि अध्यापक, अध्यापन व्यवस्थापन ह्या संकल्पनेवर आधारित ८ दिवसीय राष्ट्रीय स्तराचा शिक्षक गुणवत्ता विकास कार्यक्रम संपन्न झाला. बदलत्या काळानुसार अध्ययन अध्यापनाच्या गरजा बदलल्या आहेत. तसेच नवीन येऊ घातलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे शिक्षकांना आपल्या अध्यापन क्षेत्रात अद्यावत होणेहि गरजेचे आहे. ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन संस्थेने १० ते १७ फेब्रुवारी २०२३ ह्या कालावधीत देशभरातील प्राध्यापकांसाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

आय. एम. आर. च्या संचालक प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी पहिल्या दिवशी अनौपचारिकरित्या कार्यक्रमाचे उदघाटन केले. कार्यक्रम आयोजनामागचा उद्धेश आणि भविष्यात होणारा फायदा त्यांनी आपल्या मनोगतातून प्रकट केला. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. कामिनीबेन शाह असोसिएट प्राध्यापक सरदार पटेल विद्यापीठ गुजरात यांनी कार्यक्रमाच्या मुख्य संकल्पनेवर आधारित विवेचन केले. अध्यापनाचे काळानुसार बदललेले स्वरूप आणि त्यासाठी वापरावी लागणारी नवी कौशल्य काय असली पाहिजेत याचे सखोल विवेचन त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

दुसऱ्या दिवशी प्रेरक वक्ते आणि मॅनेजमेंट एजुकेशनचे संस्थापक डॉ. सुदिप्तो भट्टाचार्य यांनी कार्यक्रमात मार्गदर्शन केले. नवीन जग आणि नव्या पिढीच्या शैक्षणिक अपेक्षा काय आहेत आणि त्यासाठी प्राध्यापकांनी कश्या पद्धतीने बदल करत शिक्षण दर्जेदार होण्याची काळजी घ्यावी याबद्दल प्राध्यापकांशी सखोल चर्चा केली.

तिसऱ्या दिवशी ज्ञान स्रोत केंद्र मु. जे. महाविद्यालय जळगावचे डॉ. विजय कांची यांनी प्रमुख वक्ते म्हणून कार्यक्रमाला हजेरी लावली. जीवनाचा अदम्य भाग व्यवस्थापित करण्यास शिकणे त्यासाठी स्वप्ने पाहणे आणि जगण्याचे विज्ञान आणि योग ह्याची योग्य ती सांगड घालणे ह्या कौशल्यावर आधारित विषयाचे सखोल विवेचन केले.

चौथ्या दिवशी स्कुल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संचालक प्रा. डॉ. मधुलिका सोनावणे यांनी मार्गदर्शन केले. अध्यापनाच्या पलीकडे जाऊन प्राध्यापकांनी आपल्यातील सुप्त गुणांचा विकास कसा करावा, त्या गुणांद्वारे अध्यापनाचे कार्य कसे प्रभावी करावे ह्याचे विवेचन केले.

कार्यक्रमाच्या पाचव्या दिवशी जी. एच. रायसोनी इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीरिंग अँड बिसिनेस मॅनेजमेंट च्या संचालक प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. उच्च शिक्षण मूल्यवर्धन आणि नवीन शैक्षणिक धोरण २०२० ह्या विषयावर त्यांनी विस्तृत चर्चात्मक मार्गदर्शन सहभागी प्राध्यापकांना केले.
सहाव्या दिवशी अधिष्ठाता वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव चे प्रा. डॉ. अनिल डोंगरे यांनी कार्यक्रमाला संबोधित केले. सामाजिक उत्क्रांती ५.० आणि त्याचा उच्च शिक्षणाशी असलेला संबंध आणि त्याचे परिणाम ह्या विषयावर त्यांनी सखोल विचार मंथन घडवून आणले.

इंदिरा स्कुल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज पुणे चे संचालक प्रा. डॉ. आशुतोष मिसाळ यांनी सातव्या दिवशी कार्यक्रमाला मार्गदर्शन केले. नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धती च्या अनेक संकल्पना त्यांनी उलगडून दाखविल्या. विद्यार्थ्यांना सदैव कार्यरत ठेवण्यासाठी आणि नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या विविध वाटा त्यांनी प्राध्यापकांना दाखविल्या.

आठव्या आणि कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी इंडो गल्फ असोसिएशन चे डॉ. मोहन अग्रवाल यांनी डीप लर्निंग थ्रू सिम्युलेशन ह्या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांच्या चर्चात्मक व्याख्यानात सर्व प्राध्यापक उत्साहाने सहभागी झाले.

८ दिवसीय राष्ट्रीय स्तराचा शिक्षक गुणवत्ता विकास कार्यक्रमात एकूण १२८ प्राध्यापकांनी पुणे, नासिक, लखनऊ, बिलासपूर, बेंगळुरू, मुंबई, अहमदनगर आणि जळगाव येथून सहभाग नोंदविला. उच्च शिक्षण आणि अध्यापक, अध्यापन व्यवस्थापन त्यात होऊ घातलेले बदल त्यासाठी करावी लागणारी तजवीज ह्या सर्वच गोष्टींचा ह्या ८ दिवसीय कार्यक्रमात सविस्तर उहापोह झाला. प्राध्यापकांना हा कार्यक्रम भावी काळात नक्कीच मार्गदर्शक ठरेल. कार्यक्रमाचे आयोजनसाठी प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम समन्वयक डॉ. अनुपमा चौधरी आणि आय. एम. आर. चे प्राध्यापक यांनी परिश्रम घेतले.

Protected Content