अपघातात वृध्द महिलेचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कानळदा ते विदगाव रस्त्यावर एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ७३ वर्षीय वृध्द महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी २२ जून रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रभावती निंबा धनगर (चऱ्हाटे) (वय-७३, रा. शिरसाट ता. यावल) असे मृत वृध्द महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रभावती धनगर या महिला आपल्या पती व दोन मुलांसह यावल तालुक्यातील शिरसाट येथे वास्तव्याला होत्या. त्याची मुलगी जळगाव तालुक्यातील कानळदा येथे राहते. त्यांना भेटण्यासाठी प्रभावती धनगर ह्या बुधवारी २१ जून रोजी सकाळी ११ वाजता गेल्या होत्या. मुलीला भेटून दुसऱ्या दिवशी वृध्द महिला शिरसाट येथे जाण्यासाठी निघाल्या. दरम्यान, कानळदा ते विदगाव रस्त्यावरून पायी जात असतांना त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत वृध्द महिलेचा मृत्यू झाला. रस्त्यावरून जाणारे ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. महिलेजवळ असलेल्या उपचाराची फाईल वरून ओळख पटविली. त्यानुसार खासगी वाहनाने मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. या घटनेबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ ज्ञानेश्वर कोळी करीत आहे.

Protected Content