सिरसिल्ला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | तेलंगणातील सिरसिल्ला येथील एका युट्यूबरला ‘मोराची करी’ बनवून खाल्ल्याप्रकरणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संबंधित युट्यूबरने मोराची करी बनवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमुळे लोकांमध्ये संताप पसरला. प्राणीप्रेमींनी जोरदार विरोध केल्यानंतर भारताच्या राष्ट्रीय पक्ष्याच्या बेकायदेशीर हत्येला प्रोत्साहन दिल्याबद्दल रविवारी पोलिसांनी युट्यूबरविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. मोराचा व्हिडिओ युट्यूबवरून हटवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोडम प्रणय कुमार असे युट्यूबरचे नाव असून तो तेलंगणातील सिरिल्ला जिल्ह्यातील तांगल्लापल्ली येथील रहिवासी आहे. कुमारने काही दिवसांपूर्वी त्याच्या युट्यूब चॅनेलवर मोराच्या रेसपीचा व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्राणीप्रेमींनी कुमारवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर वनविभागाने प्रणय कुमारला वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत अटक केली. तसेच त्याने मोर करी बनवताना व्हिडिओ शूट केलेल्या ठिकाणाची पाहणी केली. वन अधिकारी व्हिडिओची वैधता तपासत आहेत आणि फॉरेन्सिक विश्लेषणासाठी नमुने गोळा केले आहेत. यापूर्वी, कुमारने रानडुक्कराची करी बनवतानाचा व्हिडिओ देखील शेअर केल्याचे समोर आले आहे.
सिरसिल्ला पोलिस अधीक्षक अखिल महाजन यांनी सांगितले की, कुमारविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अशी कृत्ये करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. यूट्युबर आणि करी यांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तपासात ते मोराचे मांस असल्याची खात्री पटल्यास पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. भारतीय कायद्यांनुसार, भारतात मोर बाळगणे किंवा पकडणे बेकायदेशीर आहे आणि उल्लंघन केल्यास दोषींना कठोर शिक्षा होऊ शकते.
वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ हा भारतातील एक महत्त्वपूर्ण कायदा आहे, ज्याचा उद्देश वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासांचे संरक्षण आणि संवर्धन करणे आहे. प्राण्यांची शिकार आणि व्यापार रोखण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला आहे. या कायद्यानुसार, कोणत्याही वन्य प्राण्याला पकडणे, प्राण्यांची हत्या करणे, विषबाधा करणे, पाण्यांना पकडण्यासाठी सापळा रचणे किंवा त्यांना नुकसान करणे गुन्हा आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास दोषींना कठोर शिक्षा होऊ शकते.