मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. कोथळी गावाजवळ पडलेले जीवघेणे खड्डे दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाने वारंवार मागणी करूनही कोणतेही काम केले नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या कोथळीतील जागरूक युवकांनी अखेर प्रशासनाच्या निष्क्रियतेला चपराक देत स्वखर्चाने खड्डे बुजवून एक सामाजिक आदर्श निर्माण केला आहे.
या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात होत होते. ग्रामस्थांनी वेळोवेळी विभागाकडे तक्रारी केल्या, परंतु दखल घेण्यात आली नाही. अखेर सरकारी विभागाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने युवकांनी ‘लोकसहभाग’ ही संकल्पना कृतीत उतरवण्याचा निर्णय घेतला.

उपसरपंचांसह युवकांचा पुढाकार
कोथळीचे उपसरपंच पंकज राणे यांच्या पुढाकाराने संदीप विटकरे, नामदेव चौधरी, संजय खर्चे, रितेश कोळी, भागवत महाकाळ, योगेश राणे सर, मोहन कोळी या युवकांसह अनेक ग्रामस्थ या आदर्श कार्यामध्ये सहभागी झाले. त्यांनी स्वतः वर्गणी जमा करून आणि श्रमदान करून खड्डे बुजवले. युवकांनी केलेल्या या स्तुत्य कार्यामुळे या रस्त्यावरील अपघाताचा धोका तात्पुरता का होईना कमी झाला आहे.
यावेळी स्थानिक नागरिकांनी भावना व्यक्त केली की, “सरकारी विभाग वेळेत काम करत नसला तरी, युवकांनी दाखवून दिले की इच्छाशक्ती असेल तर नागरिक स्वतःच पुढे येऊन रस्ते सुरक्षित करू शकतात.” युवकांनी दाखवलेल्या या धडाकेबाज कार्यामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ जागृत व्हावे आणि या रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी आग्रही मागणी कोथळीसह परिसरातील ग्रामस्थ करत आहेत.



