जळगाव, प्रतिनिधी | तरुणांनी निर्व्यसनी राहावे. देशभक्ती करावी. भ्रष्टाचार, हुंडा, अनिष्ट रूढी यापासून दूर राहावे. यासाठी मानसिक बळकटी मिळणे महत्वाची असून ती अधात्म्यातुनच मिळेल. त्यासाठी हरिपाठ, भजन, अभंग अशांचे वाचन तरुणांनी केले पाहिजे असे प्रतिपादन हभप ताजोद्दिन महाराज खाटिक यांनी केले.
पिंप्राळयाचा राजा स्नेहल प्रतिष्ठान तर्फे गणेशोत्सवानिमित्त कीर्तनमाला आयोजित करण्यात आली आहे. सातवे पुष्प हभप ताजोद्दिन महाराज खाटिक यांनी गुंफले. संत बहिणाबाई, कान्होपात्रा, मीराबाई अशा महिलांनी समाजात प्रबोधनाचे काम केले. घरात चांगले संस्कार पाहिजे. संस्कारांमुळे मनुष्य जीवन उजळून निघते. चांगली संगतदेखील मानवी जीवनात बदल घडवून आणते. ज्यांची संगत चांगली नाही त्यांच्या सोबत राहणे म्हणजे स्वत:च्या आयुष्याला बरबाद करण्यासारखे आहे, असेही ताजोद्दिन महाराजांनी सांगितले.