धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील बांभोरी येथील गिरणा नदीच्या पात्रात तरूणाचा खून झाल्याने परिसर हादरला आहे.
या संदर्भात माहिती अशी की, बांभोरी येथील रहिवासी असणारा आशीष प्रकाश शिरसाळे ( वय २२) या युवकाचा काल रात्री उशीरा गिरणा नदीच्या पात्रात धारदार शस्त्रांनी खून झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तो शौचास जाण्यासाठी गेल्यानंतर बराच वेळ परत न आल्याने कुटुंबियांनी शोध घेतला असता नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आला.
याची माहिती मिळताच पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी चौकशीची चक्रे फिरवण्यास प्रारंभ केला आहे. तर आशिषची क्रूर हत्या नेमकी कशामुळे झाली याचा तपास सुरू आहे. दरम्यान, तरूण आशिषच्या भयंकर मृत्यूने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.