जळगाव प्रतिनिधी । पुण्यातील विश्रामबाग येथे कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक महिलेला व्हॉट्सॲप वरून मॅसेज टाकून गैरफायदा घेतल्याप्रकरणी पुणे विश्रमाबाग पोलिसात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपीस सुप्रिम कॉलनीतून पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. नईम पटेल फारूख पटेल (वय-२०) रा.पुना नगर, सुप्रिम कॉलनी, मेहरूण असे आरोपीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, नेहा विशाल ढोमसे (वय-३२) रा.बाणेर, पुणे या महिलेला त्यांच्या मोबाईल नंबरच्या व्हॉट्सॲपवर अज्ञात व्यक्तीने ‘हाय’ करून पाठवून सुरूवात केली. मी तुझा जुना मित्र आहे, असे सांगून वारंवार महिलेला व्हॉट्सॲप नंबरवर त्रास देणे सुरू केले. दरम्यान महिलेने आपल्या पती व सासु-सासरे यांना घटनेची माहिती दिली. यानंतर त्याने पुन्हा एकदा शहरातील एका ज्वेलर्स दुकानात महिलेला निमंत्रण पत्रिका देण्याच्या बहाण्याने जवळ येण्याचा प्रयत्न केला मात्र तेथूनही तो पसार झाला होता. याप्रकरणी त्या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पुणे येथील विश्रामबाग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोबाईल लोकेशननुसार संशयित आरोपी नईम पटेल हा सुप्रिम कॉलनीत राहत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एमआयडीसी पोलीसांनी त्यांच्या घरातून त्याला ताब्यात घेतले असून पुढील कारवाईसाठी विश्रामबाग पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.