जळगाव, प्रतिनिधी । शहरातील विठ्ठल पेठ भागातील तरुणाचा पंखा दुरुस्त करतांना विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना आज (दि.१०) दुपारी ४.०० वाजेच्या सुमारास घडली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत प्रमोद सपके (वय-२०) रा.विठ्ठल पेठ हा आयटीआयचा इलेक्ट्रिशियन शाखेचा विद्यार्थी होता. शहरातील गांधी मार्केटमध्ये असलेल्या निशांत इलेक्ट्रिक या दुकानावर तो शिकाऊ म्हणून काम करत होता. आज दुपारी ४.०० वाजता पंखा दुरुस्तीचे काम करत असताना त्याला विजेचा जोरदार धक्का लागला असता त्याला दुकानदार विनोद बंडू सबके यांनी तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले. खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुपेकर यांनी त्याला मृत घोषित केले. मयत श्रीकांत हा नुकताच नशिराबाद येथील आयटीआय कॉलेजमधून इलेक्ट्रिशियन झाला होता. तो काका विनोद सपके यांच्या निशांत इलेक्ट्रिक दुकानावर प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत होता. श्रीकांतच्या पश्चात आई-वडील, व भाऊ असा परिवार आहे. श्रीकांतचे वडील प्रमोद नामदेव सपके कपडे इस्त्री करण्याचे काम करतात. प्राथमिक तपास पो.हे.कॉ. उल्हास चरहाटे व नजीर शेख करीत आहेत.