जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जुने बसस्थानक परिसरात तरूणाला धारदार चॉपरचा धाक दाखवून गळ्यातील चांदीची चैन आणि खिश्यातील रोकड असा एकुण २० हजारांचा ऐवज जबरी चोरून नेल्याची घटना मंगळवारी १७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता घडली आहे. याबाबत रात्री १० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमजद खान अमीर खान (वय ३६ वर्षे, रा. लक्ष्मीनगर, कान्हेरदा रोड) हा तरूण १७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जुन्या बसस्थानक परिसरातून जात होते. यावेळी आरोपी तनवीर शेख उर्फ तन्या शेख (रा. गेंदालाल मिल, जळगाव) याने त्यांना रस्त्यात अडवले. आरोपीने अमजद खान यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र, अमजद यांनी पैसे देण्यास नकार दिला.

पैसे नाकारल्याचा राग अनावर झाल्याने आरोपी तन्या शेख याने आपल्याजवळील ‘चॉपर’ काढून अमजद यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. इतक्यावरच न थांबता अमजदच्या गळ्यातील चांदीची चेन आणि खिशातील रोकड असा एकुण २० हजारांचा ऐवज लांबविला. याला प्रतिकार केला असता आरोपीने ‘फायटर’ने फिर्यादीच्या डोक्यावर प्रहार करून त्यांना जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तनवीर शेख उर्फ तन्या शेख याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडेकर करत आहेत.



