भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समधील एका बंद दुकानासाठी तब्बल १५७३ युनिटचे वीजबिल आले आहे. या प्रकारामुळे संबंधित व्यापारी हैराण झाला असून महावितरणच्या दुर्लक्षामुळे एप्रिल महिन्यात पुन्हा १०,००० रुपयांचे बिल आले आहे.
प्रीतम सतीश भराडिया, हे मूळचे भुसावळचे असून सध्या नोकरीसाठी शहराबाहेर वास्तव्यास आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समध्ये दुकान घेतले होते. गेली दोन वर्षे हे दुकान बंद असून, मागील एक वर्षांपासून वीज पुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे. दरमहा केवळ १ युनिटचा वीजबिल येत होते. मात्र मार्च २०२५ मध्ये अचानक १५७३ युनिटचे बिल आले. प्रीतम भराडिया यांनी २० मार्च रोजी शांतिनगर महावितरण कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली. मात्र आज अखेर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
इतकेच नव्हे, तर एप्रिल महिन्याचे पुन्हा १०,००० रुपयांचे नवीन बिल आले आहे. भराडिया यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असतानाही कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. “बंद दुकानासाठी जर एवढं मोठं बिल येत असेल, तर उघड्या दुकानांचे व्यापाऱ्यांना किती जास्त वीजबिल भरावे लागत असेल?” असा सवाल भराडिया यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणात महावितरणकडून तत्काळ चौकशी करून योग्य तो न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.