भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरात एखादा गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणाला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. मजहर अब्बास जाफर इराणी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून १७ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूलन व जीवंत काडतूस जप्त केले आहे. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी, १७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी गस्तीवर असताना त्यांना एका संशयास्पद तरुणाबाबत माहिती मिळाली. भुसावळ शहरातील हसन अली नियाज अली यांच्या घराच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक ठिकाणी मजहर इराणी हा तरुण दबा धरून बसला होता. पोलिसांनी संशयावरून त्याची झडप घेतली असता त्याच्याकडे घातक शस्त्र मिळून आले.

संशयित आरोपी मजहर इराणी याच्याकडे १५ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि २ हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे असा एकूण १७ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करून तो हे शस्त्र बाळगत होता. हा तरुण एखादा मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पो.कॉ.महेंद्रसिंग पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक विजय नेरकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



