
मुंबई (वृत्तसंस्था) सर (तुम्हाला देशात शांतता हवी असेल तर) तुमच्या आयटी सेलच्या ट्विटर हॅण्डलपासून सामान्यांना लांब राहण्यास सांगा. या हॅण्डलवरुनच सर्वाधिक अफवा, खोटी माहिती पसरवली जाते. ही माहिती देशाच्या बंधुत्वाला, शांततेला आणि एकतेला मारक आहे. सर तुमचे आयटी सेल हीच खरी तुकडे तुकडे गँग आहे. कृपया त्यांना द्वेष पसरवण्यापासून थांबवा, असे अभिनेत्री रेणुका शहाणेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटला रिट्वीट केले आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध देशभर आंदोलने सुरु आहेत. आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. या घटनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन लोकांना शांततेंचे आवाहन केले आहे. मोदींच्या या ट्वीटला अभिनेत्री रेणुका शहाणेने रिट्वीट केले आणि भाजपच्या आयटी सेलला शांत राहण्याचे आणि अफवा न पसरवण्याचे आवाहन करा, असे मोदींना सांगितले आहे. रेणुका शहाणेने रिट्वीट करताना म्हटले की, “सर, तुम्ही कृपया तुमच्या (भाजप) सर्व आयटी सेटला ट्विटर हँडलपासून दूर राहण्याचे आवाहन करा. जास्तीत जास्त अफवा त्यांच्याकडून पसरवल्या जात आहेत. त्यांची जास्तीत जास्त माहिती खोटी आणि भ्रम पसरवणारी असते. ती देशातील शांती, एकात्मतेच्या विरोधात आहे. तुमची आयटी सेल खरी तुकडे-तुकडे गँग आहे. कृपया त्यांना द्वेष पसरवण्यापासून थांबवा.” रेणुका शहाणेचे हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यपसह हजारो युजर्सनी रेणुका शहाणेचे ट्वीट रिट्वीट केले आहे. रेणुका शहाणेंचं हे ट्विट जवळपास 9 हजारांपेक्षा जास्त युजर्सनी रिट्विट केले आहे. शिवाय 23 हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक आणि जवळपास 2 हजारापर्यंत कमेंट केल्या आहेत.