पहूर येथे वाघुर नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

 

pahur crime

पहुर ता.जामनेर प्रतिनिधी । पहूर कसबे येथील तरुण आज सकाळी वाघुर नदी जवळ प्रांतविधी करण्यासाठी गेला होता. पंरतू बाजूलाच असलेल्या डोहामध्ये पाय घसरल्याने त्याचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत पहूर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, शाहरुख शेख आयुब खाटीक (वय 27) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याला पोहता येत नसल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. त्याठिकाणी उपस्थित असलेले केतन जाधव व संजय बाविस्कर या तरुणांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र नदीमध्ये पाण्याचा प्रभाव जास्त असल्याने दहा ते पंधरा मिनिटं तो सापडला नाही. सापडल्यानंतर त्याला तात्काळ येथील ग्रामीण रुग्णालय उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉ.संदीप कुमावत यांनी तपासणीदरम्यान त्याला मृत घोषित केले.

शेख शाहरुख खाटीक हा मटण मार्केटमध्ये कामगार म्हणून काम करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या या दुर्दैवी घटनेमुळे पहूर शहरावर शोककळा पसरली असून पहूर ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शेख शाहरुख खाटीक हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शेख याच्या पश्चात आई वडील पत्नी एक वर्षाची मुलगी असा परिवार आहे.

पहूर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पहूर पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अनिल अहिरे, पोलीस नाईक किरण शिंपी, पो.काँ.जितुसिंग परदेशी, पो.काँ.अनिल देवरे, ईश्वर देशमुख, होम.राजु देशमुख व दिपक सावळे हे करीत आहे.

 

Protected Content