Home क्राईम पोलिस भरतीदरम्यान धावताना तरुणाचा मृत्यू

पोलिस भरतीदरम्यान धावताना तरुणाचा मृत्यू


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पोलिस भरतीसाठी वर्षानुवर्षे मेहनत घेणाऱ्या तरुणांसाठी बीडमधून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान 1600 मीटर धावण्याच्या चाचणीत सहभागी झालेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड येथे सध्या पोलिस भरतीची मैदानी शारीरिक चाचणी सुरू आहे. आज धावण्याची परीक्षा सुरू असताना दीपक भास्कर वावळ (रा. परळी तालुका) हा 1600 मीटर धावत असताना अचानक अस्वस्थ झाला. धावत असतानाच त्याला चक्कर आली आणि तो मैदानावर कोसळला.

मैदानावर उपस्थित पोलिस अधिकारी आणि वैद्यकीय पथकाने तातडीने त्याला उपचारासाठी बीडच्या शासकीय रुग्णालयात हलवले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याची प्रकृती गंभीर झाली होती. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दीपक वावळ हा पोलिस भरतीसाठी बीडमध्ये आला होता. मुलगा पोलिस बनून परत येईल, या आशेने कुटुंबीयांनी त्याला पाठवले होते. मात्र, भरती प्रक्रियेदरम्यानच त्याचा मृत्यू झाल्याने वावळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, राज्यभरात विविध जिल्ह्यांत पोलिस भरती प्रक्रिया सुरू आहे.

उमेदवारांनी कोणत्याही अमिषांना बळी पडू नये तसेच स्टेरॉईडसारख्या प्रतिबंधित औषधांचा वापर करू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. पोलिस भरतीत धावणे, गोळाफेक आणि इतर मैदानी चाचण्यांचा समावेश असतो. या घटनेबाबत पुढील तपास सुरू आहे.


Protected Content

Play sound