जळगाव – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कासमवाडी येथे मागील भांडणाच्या कारणावरून २२ वर्षीय तरूणावर कोयत्याने वार केल्याची घटना सोमवारी १४ मार्च रोजी दुपारी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, “अनिल रसाल राठोड (वय-२२) रा. कासमवाडी जळगाव हा तरूण आईवडील व दोन भावांसह वास्तव्याला आहे. अनिलचा लहान भाऊ सुनिल राठोड आणि गौरव चौधरी यांच्यात दसऱ्याच्या दिवशी भांडण झाले होते. या भांडणाच्या रागातून शुक्रवार, दि.११ मार्च रोजी सोनू चौधरी व गौरव चौधरी हे हातात कोयत्यासारखे धारदार शस्त्र घेवून खुन्नस देत होते. याकडे सुनिलने दुर्लक्ष केले.
दरम्यान सोमवारी, १४ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास लॉड्रीवरून अनिल राठोड हा कपडे आणत असतांना सोनू गोपाल चौधरी याच्यासह इतर दोन ते तीन जणांनी येवून त्याच्या हातातील धारदार कोयत्याने डोक्यावर वार केले. यात अनिल गंभीर जखमी झाला. स्वत:चा जीव वाचवित तो घराकडे पळत आला. नातेवाईकांनी तातडीने जखमी झालेल्या अनिल खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. याप्रकरणी अनिल रसाल राठोड यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.