धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जमिनीच्या जुन्या वादातून तरूणासह त्याच्या कुटुंबाला मारहाण करत त्यांच्या घरावर दगडफेक करण्यात आल्याची घटना तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे घडली असून या प्रकरणी तीन महिलांसह एकूण नऊ जणांच्या विरोधात धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, धरणगाव पोलीस स्थानकात पिंप्री खुर्द येथील हरीश संदीप पांडे ( वय 29, रा. मारवाडी गल्ली ) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या वडिलांनी 2009 साली भोद शिवारातील गट क्रमांक 129/1/ब मधील जमीन चुलत काका रामू उर्फ रमेश मिश्रीलाल पांडे यांच्याकडून विकत घेतली आहे. तेव्हापासूनच रमेश पांडे व त्यांचे कुटुंब हे सातत्याने यावरून धमकी, शिवीगाळ आदी करत असतात.
दरम्यान, शुक्रवार दिनांक 14 मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास हरीश संदीप पांडे हे त्यांच्या मित्रासह मोटारसायकलीवरून जात असतांना रामू उर्फ रमेश मिश्रीलाल पांडे यांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. तसेच त्यांनी कुटुंबियांना बोलावून या सर्वांनी त्यांना बेदम मारहाण केली. दरम्यान हरीश पांडे यांचे कुटुंबिय तेथे आले असता या सर्वांनी त्यांना देखील मारहाण केली. यासोबत त्यांनी त्यांच्या घरावर दगडफेक देखील केली.
या प्रकरणी हरीश संदीप पांडे यांनी धरणगाव पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार रामू उर्फ रमेश मिश्रीलाल पांडे, चेतन संजय पांडे, मनोज मिश्रीलाल पांडे, दिनेश मिश्रीलाल पांडे, केतन संजय पांडे, देव दिनेश पांडे यांच्यासह तीन महिलांच्या विरोधात ( सर्व राहणार पिंप्री खुर्द, ता. धरणगाव ) भारतीय न्याय संहिता कायदा 2023च्या अंतर्गत कलम-189 (2); 191 (2); 190, 115 (2); 118 (1); 296; 351 (2); 351 (3) आणि 125; तर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1), 37 (3) तसेच 135 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.