धानोरा (प्रतिनिधी) गाव व परिसरात सध्या पाण्याची पातळी कमालीची खालावल्याने पावसाळ्यात नाल्यातून वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी येथील गवळी नाला, पालक नाला, बिडगाव रस्त्यावरील शेती शिवारातील भागात लोक सहभागातून नाला खोलीकरणास (दि.२३) प्रारंभ करण्यात आला.
खालावलेल्या पाणी पातळीची चिंता पाहता भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी गावातीलच काही तरुण शेतकऱ्यांनी मिळून नाला खोलीकरण करण्यासाठी सोशल मीडियावरून संदेश फिरवून याद्वारे लोकवर्गणी जमा केली आणि प्रत्यक्ष नाला खोलीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. गावातील मारुती मंदिर चौकात एक सार्वजनिक सभा आयोजित करुन पैसे गोळा करण्यात आले.तरुण शेतकऱ्यांच्या या सकारात्मक दृष्टिकोनास गावातील लोकांचा प्रतिसाद मिळत असून या कामासाठी स्वतःहून शेतकरी व गावातील ग्रामस्थ पुढे येत सढळ हाताने मदत करत आहेत.
धानोरा परिसरात उत्तरेला सातपुडा पर्वतावरील पावसाचे पाणी वाहत येवून थेट नाल्यातून तापी नदीला मिळत असते. त्या पाण्याला कुठेतरी अटकाव व्हावा, यासाठी या तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नाला खोलीकरण करणासाठी पुढाकार घेतला आहे, तरी गावातील व परिसरातील शेतकरी ग्रामस्थांनी जास्तीत जास्त संख्येने या मोहिमेत सहभागी होऊन श्रमदान करण्यासाठी पुढे येण्याची गरज निर्माण झालेली आहे. यावेळी डॉ. आंबेडकर अभ्यासिका संचालक प्रशांत सोनवणे, क्रीडा शिक्षक देविदास महाजन, प्रदिप महाजन, अनंत पाटील,विवेकानंद महाजन, हितेंद्र पाटील, संदिप गुजर, प्रकाश पाटील, निजाम तडवी, शरद कुंभार आदी उपस्थित होते. यावेळी गावातील तरुण शेतकऱ्यांनी श्रमदानही केले.