

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात महिलांच्या आरोग्यप्रती जागरूकता वाढवण्यासाठी “सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी” तर्फे एक विशेष योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. दिनांक 15 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान सकाळी ७:३० ते ८:३० या वेळेत लायन्स सेंट्रल हॉलवर हे शिबिर पार पडले. या उपक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मु.जे. महाविद्यालयातील योग विभागातर्फे आयोजित या शिबिरात महिलांना योगासने, प्राणायाम, ध्यान आणि नैसर्गिक उपचारांच्या विविध तंत्रांची माहिती देण्यात आली. योग व नैसर्गोपचार या विषयातील अनुभवी मार्गदर्शक प्रा. डॉ. देवानंद सोनार आणि प्रा. डॉ. ज्योती वाघ यांनी प्रत्यक्ष मार्गदर्शन करत योगाचे शास्त्रीय महत्त्व विशद केले. शारीरिक व मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी योगशास्त्र कसे उपयोगी पडते, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देत महिलांमध्ये आत्मविश्वास जागविण्यात आला.
या उपक्रमात सौ. अर्चना गुरव आणि सौ. कविता चोपडे यांनी नियोजन आणि व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावली. शिबिराचे प्रभावी संचालन योग प्रशिक्षक सौ. मीनल इंगळे यांनी केले. त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली उपस्थित महिलांनी विविध योगासने आत्मसात केली. त्यांना सहाय्यक योग शिक्षिका कीर्ती काटे, रजनी मडावी आणि सुवर्णा क्षिरसागर यांचे सहकार्य लाभले. योगसाधनेबद्दल उपस्थित महिलांमध्ये उत्साह व नवचैतन्य निर्माण झाल्याचे या शिबिरादरम्यान जाणवले.
या शिबिराच्या माध्यमातून महिलांनी केवळ शारीरिक तंदुरुस्तीच नव्हे तर मानसिक आरोग्य, तणावमुक्त जीवनशैली आणि आत्मविकासाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकले आहे. शिबिरात सहभागी महिलांनी आयोजकांचे आभार मानत असे उपक्रम वारंवार घेण्याची मागणी केली.



