मुंबई प्रतिनिधी । काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदारांच्या मुंबईतील प्रवेश सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते की, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवेसनेची युती अभेद्य राहणार असून, यावेळी बहुमताचे विक्रम तोडून युती सत्तेत येईल व येत्या 15 दिवसात जागा वाटपाबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे ते यावळी म्हणाले.
मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, वैभव पिचड, शिवेंद्रसिंहराजे भोसले, चित्रा वाघ, कालिदास कोळंबकर, संदीप नाईक, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक, माजी आयपीएस अधिकारी साहेबराव पाटील आणि महात्मा फुले यांच्या वंशज नीता होले यांचे पक्षात स्वागत केले. भारतीय जनता पक्ष ही धर्मशाळा नसून कुणालाही भाजपत प्रवेश दिला जात नसल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले. भाजप कुणालाही धमक्या देऊन प्रवेश देत नाही. भाजपला धमक्या देऊन कुणाला पक्षात घेण्याची काही आवश्यकता नाही. एक काळ असता होती की भाजप कार्यकर्ते इतरांच्या मागे फिरायचे. मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आज अनेकजण पक्षात येण्यास उत्सुक आहेत. मात्र जे चांगले काम करतात अशांनाच प्रवेश देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही युतीचेच सरकार राज्यात आणणार आहोत, नव्हे राज्यातील जनताच आमचे सरकार आणणार आहे. उद्या पासून राज्यात महाजनादेश यात्रा सुरू होत असून या यात्रेदरम्यान जनादेश युतीच्या पाठिशी आणण्याचे काम आपण करणार असल्याचे मुख्यमंत्री पक्ष प्रवेश सोहळ्यात म्हणाले.