नवी दिल्ली (वृत्तसेवा) कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते बी एस येडीयुराप्पा यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना हजारो कोटींची लाच दिल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. विशेष म्हणजे ही डायरी आयकर विभागाच्या ताब्यात 2017 पासून असूनही पंतप्रधान मोदी यांनी त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले नसल्याचा आरोपही सुरजेवाला यांनी केला आहे. दरम्यान, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडूरप्पांनी लिहिलेल्या एका डायरीत भाजप नेत्यांसह न्यायधीशांना १८०० करोड रुपये दिल्याचा हिशोब लिहून ठेवला असल्याचा खळबळजनक खुलासा कॅरवान मॅग्झीनने केला आहे.
कॅरवान मॅग्झीनने आज एक रिपोर्ट प्रकाशित केली आहे. या रिपोर्टनुसार आयकर विभागाकडे एक अशी डायरी आहे. ज्यात न्यायधीशांना २५० कोटी रुपये दिल्याचा हिशोब आहे. तसेच भाजप नेत्यांना १०० पासून ते १० कोटी दिल्या पर्यंतचा हिशोब लिहिलेला आहे. कॅरवान मॅग्झीनच्या दाव्यानुसार ही डायरी येडूरप्पांनी यांची आहे. २००९ मध्ये त्यांनी स्वतःच्या हाताने ती लिहिली असून त्यात राजनाथ सिंह १०० कोटी, मुरली मनोहर जोशी आणि अडवाणी यांना ५० कोटी दिल्याचे लिहिले आहे. तसेच गडकरी यांच्या मुलाच्या लग्नावेळी १० कोटी दिले आहेत. एवढेच नव्हे तर, येडूरप्पांनी लिहिले आहे की, भाजपच्या केंद्रीय कमेटीला १ हजार कोटी दिले असून जेटली यांना दीडशे कोटी दिले आहेत.
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज पत्रकार परिषद घेणार होते. मात्र दिवसभरात दोनदा त्यांची पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली. शेवटी रणदीप सुरजेवाला यांनी ही पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी दोन महत्वाचे केंद्रीय मंत्री आणि कर्नाटकातीलभाजपाचे महत्वाचे नेते येडीयुराप्पा यांच्यावर गंभीर आरोप केले. यासाठी त्यांनी सीबीआयकडील डायरीचा उल्लेख करत त्याच्या प्रती माध्यमांना दिल्या. येडीयुराप्पा यांना 2011 मध्ये खनिज घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात अटक झाली होती. यानंतर त्यांची 24 दिवसांनी सुटकाही झाली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. याप्रकरणी सीबीआयने टाकलेल्या छाप्यांत 2017 मध्ये येडीयुराप्पांची डायरी जप्त केली होती. या डायरीमध्ये केंद्रातील मोठ्या नेत्यांना तब्बल 1800 कोटी रुपये लाच दिल्याचा उल्लेख केला आहे.