यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहर व परिसरात महावितरणच्या मनमानी व भोंगळ कारभारामुळे वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याने नागरिक त्रस्त झाले असून, या अस्थिर वीजसेवेविरोधात नागरिकांमध्ये तीव्र असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी जोर धरली आहे.
गेल्या काही दिवसांपासून यावल शहरासह तालुक्यातील विविध भागांमध्ये वीजपुरवठा कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे खंडित केला जात आहे. दिवस असो वा रात्र, कोणत्याही क्षणी वीजपुरवठा बंद पडत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, व्यापारी, तसेच रुग्णालये व इतर महत्त्वाच्या सेवा अडचणीत सापडल्या आहेत. वीजेच्या या अस्थिरतेमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

महावितरण कंपनीकडून कुठलाही ठोस कार्यक्रम जाहीर न करता अचानक वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागांमध्ये दिवसभरात तीन ते चार वेळा वीजपुरवठा खंडित होतो, तर काही वेळा तासन्तास वीज येत नाही. यामुळे घरगुती कामकाज, शाळांचे ऑनलाईन वर्ग, व्यवसायिक उपक्रम, तसेच आरोग्य सेवा या सर्वच क्षेत्रांवर परिणाम होत आहे.
महावितरणकडून देखभाल व दुरुस्तीसाठी वेळोवेळी नियोजन न केल्यामुळे नागरिकांना अनावश्यक त्रास सहन करावा लागत आहे. यावल शहरातील विविध प्रभागांमध्ये नागरिकांनी या त्रासाविरुद्ध आवाज उठवण्यास सुरुवात केली असून, महावितरणने वेळीच लक्ष घालून हा भोंगळ कारभार थांबवावा, अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला जात आहे.
शहर व तालुक्यातील जनतेने मागणी केली आहे की, महावितरणने नागरिकांच्या भावना व अडचणी लक्षात घेऊन तात्काळ योग्य उपाययोजना कराव्यात. अन्यथा हा संताप आणखी उग्र होण्याची शक्यता आहे.



