यावल प्रतिनिधी | तालुक्यातील चुंचाळे येथील चार आणि तीन वर्षे वयाची दोन भावंडे बेपत्ता झाली असून परिसरात त्यांचा शोध सुरू असून रात्री उशीरापर्यंत त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नव्हती.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील चुंचाळे येथील गायरान परिसरात रवींद्र सावळे आणि उज्ज्वला सावळे हे दाम्पत्य वास्तव्यास आहे. त्यांना रितेश आणि हितेश ही अनुक्रमे चार आणि तीन वर्षांची मुले आहेत. आज आपल्या आई-वडिलांच्या सोबत ही दोन्ही मुले शेतात गेली होती. सावळे दाम्पत्य शेतात काम करत असतांना ही दोन्ही मुले खेळत असल्याने कुणी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. मात्र दुपारी दोनपासून ती मुले दिसून न आल्याने त्यांचा परिसरात शोध घेण्यात आला.
चुंचाळे शिवारासह नायगाव, सौखेडासीम आदींसह पंचक्रोशीत त्यांचा दुपारपासून शोध घेण्यात येत असला तरी ते मिळून न आल्याने सावळे दाम्पत्य धास्तावले आहे. या संदर्भात रात्री नऊ वाजेपर्यंत मुलांचा शोध लागला नव्हता. तसेच याबाबत पोलीस स्थानकात तक्रार देखील नोंदविण्यात आली नव्हती.