यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी तालुक्यातील कासवा येथील दोन ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकार्यांनी अपात्र घोषीत केले आहे.
तालुक्यातील कासवा येथे शासकीय जागेवर अतिक्रमण व बांधकाम करणे कासवा ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांना भोवले आहे. या संदर्भात विनोद श्रावण कोळी यांनी ग्रामपंचायत सदस्य लताबाई पंढरीनाथ सपकाळे व पवन पंढरीनाथ कोळी यांच्याविरुद्ध तक्रार केली होती.
या सदस्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून शासकीय जागेवर अतिक्रमण व बांधकाम केल्याचे म्हटले होते. यासंदर्भात चौकशीनंतर दोघा सदस्यांनी अतिक्रमण करुन बांधकाम केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास अपात्र घोषित करण्यात आले. हा निकाल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला. यामुळे आता हे दोन्ही सदस्य अपात्र झाले आहेत.