यावल प्रतिनिधी । अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजांची पालखी मिरवणूक आज येथे शहरात सायंकाळी उत्साहात निघाली होती. बोरावल गेट परिसरातील धनश्री चित्र मंदिरात पालखीचे आगमन होताच माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे यांनी व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांनी सपत्नीक श्री मूर्ती व पादुकांचे पूजन केले.
त्यानंतर शहरातील मुख्य मार्गावरून पालखी मार्गस्थ झाली. सायंकाळी उशिरा शिवाजीनगरात प्रा. मुकेश येवले यांचे निवासस्थानी पालखीचे आगमन होऊन तेथे पूजा-अर्चा, आरती व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पालखी मिरवणूकीत अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ मंदिरातील सेवेकरी पारंपारीक पोषाखात लक्ष वेधून घेत होते. उद्या (ता.१४) सकाळी सातला अभिषेक होऊन पालखी फैजपूर व सावदा कडे मार्गस्थ होणार आहे.