यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यात सर्वत्र खळबळ उडविणाऱ्या चितोडा येथील खून प्रकरणात एका महिलेसह तिघांना न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
यावल तालुक्यातील चितोडा येथील मनोज संतोष भंगाळे या ३६ वर्षीय तरुणांकडून गावातील कल्पना शशिकांत पाटील या महिलेने चार लाख रुपये उसनवारीने घेतले होते. भंगाळे उसनवारीचे पैसे वारंवार मागत असल्याच्या कारणावरून महिलेने देवानंद बाळू कोळी (रा. यावल ह. मु. चितोडा) व निमगाव येथील मितेश उर्फ मिग्नेश भरतसिंग बारेला यांच्या सह अन्य अज्ञात संशयीत यांनी मनोज भंगाळे यांचा रविवारी रात्री खून केला. याप्रकरणी पोलिसांनी महिलेसह देवानंद बाळू कोळी , व मितेश उर्फ मिग्नेश भरतसिंग बारेला यास अटक केली आहे अटकेतील संशयीतांना आज येथील न्यायालयात उपस्थित केले असता न्यायाधीश एम. एस. बनचरे यांनी तिघांना सोमवार दि. २९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले व त्यांचे सहकारी या गुन्ह्यातील पुढील तपास करीत आहेत. या गुन्ह्यात आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.