स्त्रीगीते खानदेशातील अनमोल खजिना – शकुंतला पाटील

जळगाव  – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | स्त्रीगीते खानदेशातील अनमोल खजिना आहे, असे प्रतिपादन लेखिका शकुंतला पाटील- रोटवदकर यांनी केले.

 

अथर्व पब्लिकेशन्सच्या पिंप्राळा उपनगरातील श्रीरत्न कॉलनी भागातील मुख्य कार्यालयात कानबाई उत्सव, गौराई उत्सव व गुलाबाई उत्सव या तीन पुस्तकांचा प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणल्या की, परंपरेनं खानदेशाच्या अहिराणी संस्कृतीत कानूबाई, गौराई, गुलाबाई हे लोकोत्सव असून, समृद्ध अहिराणीच्या सेवेची संधी साधण्यासाठी ते साजरे करण्यात चैतन्य संचारते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे कर्मचारी संजय शिंदे, चोपडा येथील शरश्चंद्रिका पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अजय शिंदे, अथर्व पब्लिकेशन्सचे संचालक युवराज माळी, कुमुद पब्लिकेशन्सच्या संचालिका संगीता माळी, शरद महाजन, गिरीश चौगावकर, दीपक साळुंखे, सागर गुरव, स्वाती संजय शिंदे, लक्ष्मी शिंदे, गौरी शिंदे आदी उपस्थित होते. याप्रसंगी श्री. माळी म्हणाले की, लोकभाषेतील लोकगीते पुरुषांपेक्षा स्त्रियांची अधिक आढळतात. स्त्रियांची गीते साहित्य, समाज, संस्कृतीदृष्ट्या मोलाचा ठेवा आहेत. कानबाई-गौराईची गीते आनंदाचे प्रतीक आहेत. शब्दसौंदर्याने नटलेली कल्पनेच्या श्रीमंतीने वैभवशाली झालेल्या गीतांनी उच्च-नीच, गरीब-श्रीमंतीच्या विषमतेला थारा दिला नाही. या गीतांनी समाजमनाला एकत्र बांधले अन् बांधत आली. याप्रसंगी सौ. माळी यांनी मनोगत व्यक्त केले. गिरीश चौगावकर यांनी सूत्रसंचालन केले. दीपक साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. संजय शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content