यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी – समाजाने काळाच्या ओघात कालबाह्य झालेल्या अनिष्ट प्रथांचा त्याग करावा असे आवाहन प्रा. जयेंद्र लेकुरवाळे यांनी केले. ते येथील सकल मराठा समाजाच्या स्नेहमेळाव्यात बोलत होते.
यावल तालुका सकल मराठा सेवा संस्थेच्या वतीने यावल शहरातील सकल मराठा समाजाचा स्नेह मेळावा रविवारी येथील भुसावळ रस्त्यावरील एम. के .फॉर्म हाऊस मध्ये उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष अतुल पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून भुसावळचे माजी नगरसेवक प्राध्यापक जयेंद्र लेकुरवाळे, स्वयंदीप प्रतिष्ठानचे संचालक तथा जिल्हा बालकल्याण समिती सदस्य संदीप पाटील (सोनवणे ), फैजपूर उपविभागीय अधिकारी कैलास कडलग, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. सुरुवातीस राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्राध्यापक जयेंद्र लेकुरवाळे यांनी मराठा समाजाने समाजातील अनिष्ट प्रथेचा त्याग करून आधुनिक विचारसरणी अवलंबवावी असे आवाहन केले. तसेच, महिलांनी आपल्या मुलांना शिक्षित करावे ,आई जिजाऊंनी अत्यंत परिश्रम घेऊन छत्रपती शिवाजींना घडविले त्याप्रमाणे प्रत्येक मातेने आपल्या मुलांकडे लक्ष घालून समाजाततील एक आदर्श व्यक्तिमत्व घडवावे असे सांगितले. तर स्वयंदीप प्रतिष्ठानचे संचालक संदीप सोनवणे यांनी समाजातील मराठा युवक युवतींनी शैक्षणिक प्रगती करत युवकांनी विविध व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी होण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी आजच्या शैक्षणिक स्पर्धेत उतरण्यासाठी, मुलांनी मोबाईल टीव्ही यांना दूर ठेवून स्पर्धा परीक्षांची तयारी करावी पालकांनी आपल्या पाल्यांकडे अत्यंत लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी विनिता सोनवणे यांनी महिलांनी, आई जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारत आपल्या पाल्यांकडे, लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले संस्थेचे अध्यक्ष अतुल पाटील यांनी अध्यक्षीय भाषण केले .
प्रास्ताविक प्राध्यापक मुकेश येवले यांनी तर सूत्रसंचालन अतुल यादव यांनी केले. कार्यक्रमास बापू भोसले ,शहाजीराव यादव ,अनिल जाधव, विजय पवार, माजी उप नगराध्यक्ष रुकमाबाई भालेराव, बाळू कोलते यांचे सह शहरातील समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळावा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शहरातील मराठा समाज युवकांनी महत्वाचे परिश्रम घेतले.