यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | यावलच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्वयंसिद्धा अभियान कार्यशाळेचे उद्घाटन उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग अंतर्गत युवती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २४ फेब्रुवारी ते ३ मार्च यादरम्यान स्वयंसिद्धा अभियान कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. या कार्यशाळेचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आयक्यूएसी समितीचे समन्वयक प्रा. एस .आर. गायकवाड यांनी भूषवले. विद्यार्थी विकास विभागाचे प्रमुख डॉ. एस. पी. कापडे यांनी प्रास्ताविक यांनी केले.
स्वयंसिद्धाचे प्रशिक्षक गोपाल जोनवाल यांनी सांगितले की, महिलांना समाजात वावरत असताना स्वयंसिद्ध झाले पाहिजे आणि अन्याय अत्याचार विरोधात लढा उभारला पाहिजे. यासाठी विविध तंत्र आत्मसात करणे गरजेचे आहे. प्रा. एस. आर. गायकवाड यांनी अध्यक्षीय भाषणात विचार व्यक्त केले की, प्रत्येक स्त्रीला स्वतःचे रक्षण करता आले पाहिजे. प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवती सभा प्रमुख डॉ. सुधा खराटे यांनी केले तर आभार डॉ. पी. व्ही. पावरा यांनी मानले. या कार्यक्रमात प्रेमलता जोनवाल या स्वयंसिद्धाच्या कोच देखील उपस्थित होत्या. एकूण ५० विद्यार्थिनी या कार्यशाळेत सहभागी झालेल्या आहेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एम. पी. मोरे, सुभाष कामडी, प्रमोद भोईटे, याज्ञीका जावळे व अनिल पाटील यांनी सहकार्य केले.