यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील बोरावल गेट भागात पाणी भरण्याच्या वादातून एका कुटुंबवार हल्ला चढविण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा
शहरातील बोरावल गेट भागात पाणी भरण्यासाठी नळी लावण्यावरून झालेल्या वादातून एका कुटुंबावर हल्ला करण्यात आला असून यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. या संदर्भात याच परिसरातील रहिवासी कमाबाई राजू पटेल यांनी फिर्याद दिली. यात म्हटले आहे की, गुरुवारी सायंकाळी सहा वाजता त्यांची नात आयेशा फारूक पटेल व मुलगी फरिदा पटेल हे शेजारी दत्तू धनगर यांच्या घरातून नळाचे पाणी घेण्यासाठी नळी लावत होत्या. त्यांच्या घराशेजारी मीना समशेर तडवी व तिची मुलगी फातिमा समशेर तडवी या दोघी येऊन शिवीगाळ करून आम्ही तुम्हाला पाणी भरू देणार नाही, असे बोलून त्यांनी वाद घातला. यानंतर काही वेळातच मीना तडवी व तिची मुलगी फातिमा, आरिफ राजू तडवी, सरफराज समशेर तडवी, शाहरुख सिकंदर तडवी, गोलू कलींदर तडवी व कलिंदर रमजान तडवी हे कुर्हाड व लाठ्या घेऊन आले.
याप्रसंगी कमाबाईंचे पती राजू लतीफ पटेल (वय ६५) हे घराबाहेर खाटेवर झोपले असताना आसिफ तडवी याने कुर्हाडीने त्यांच्या डोक्यावर वार केला. तर, इतर लोकांनी काठ्यांनी जब्बार राजू पटेल, अरबाज राजू पटेल, नसीम आरिफ पटेल, फरिदा पटेल व आयेशा पटेल यांना मारहाण केली. यातील राजू पटेल, जब्बार पटेल व अरबाज पटेल यांना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवले. यात राजू पटेल यांची प्रकृती गंभीर आहे.
घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे यांनी भेट देऊन जखमींची विचारपूस केली. या प्रकरणी मीना तडवी व तिची मुलगी फातिमा, आरिफ राजू तडवी, सरफराज समशेर तडवी, शाहरुख सिकंदर तडवी, गोलू कलींदर तडवी व कलिंदर रमजान तडवी या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुदाम काकडे करत आहेत.