यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामार्फत व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सहभागातून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. बोरावल खुर्द येथे पार पडलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, ग्रामीण भागात व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश देण्यात आला.
प्रभारी प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीची थीम “विकसित भारत का मंत्र, भारत हो नशे से स्वतंत्र” अशी होती. वाढत्या व्यसनाधीनतेमुळे तरुणांमध्ये निर्माण होणाऱ्या सामाजिक आणि आरोग्यविषयक समस्यांबाबत जनजागृती करण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता.

रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देत गावातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. तंबाखूजन्य पदार्थ आणि अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे गंभीर दुष्परिणाम, तसेच व्यसनामुळे कुटुंब आणि समाजावर होणारे परिणाम याबाबत माहिती देण्यात आली. व्यसनाधीनतेमुळे व्यक्तीची सामाजिक प्रतिमा मलिन होते आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, याची जाणीव करून देण्यात आली.
ही जनजागृती रॅली गावातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. विठ्ठल मंदिर मार्गे जिल्हा परिषद शाळेजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी उपस्थित नागरिकांना व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच, बोरावल गावातील आदिवासी वस्ती पाड्यावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विशेष जनजागृती आणि समुपदेशन करण्यात आले. यामुळे समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंतही व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम समन्वयक डॉ. आर. डी. पवार, प्रा. आर. एस. सिरसाठ, प्रा. पी. व्ही. मोरे, भैरवी चौधरी, तृप्ती पाटील, अक्षय पाटील, शुभांगी अडकमोल आदींनी परिश्रम घेतले.



