सोशल मीडियातील भाईगिरी भोवली; बाप-लेकाच्या विरूध्द गुन्हा !

यावल अय्यूब पटेल | व्हाटसअप स्टेटसवर शस्त्रांचे प्रदर्शन करून भाईगिरीची हौस बाप व त्याच्या मुलाच्या अंगलट आली असून त्यांच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, यावल तालुक्यातील दगडी येथील हिरामण मोतीराम मोरे (वय ५७) आणि त्यांचा मुलगा अशोक हिरामण मोरे (वय २६) यांनी व्हाटसअपच्या स्टेटससाठी शॉर्ट व्हिडीओ तयार केला. यात हिरामण मोरे यांच्या हातात देशी बंदूक तर त्यांच्या मुलाच्या हातामध्ये तलवार दिसून येत आहे. याला एडिट करून आपल्या कथित शत्रूंना यातून अशोक मोरे याने धमकावले आहे. दगडी गावासह परिसरात सोशल मीडियावरून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन यावल पोलीस स्थानकाच्या पथकाने आज दगडी गाव गाठून हिरामण मोतीराम मोरे आणि त्याचा मुलगा अशोक हिरामण मोरे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून देशी बंदूक आणि तलवार देखील जप्त करण्यात आली. तसेच त्यांच्या विरूध्द भारतीय हत्यार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच चर्चा सुरू असून या बाप-बेट्याला सोशल मीडियातील भाईगिरी भोवल्याचे मानले जात आहे.

ही कारवाई पो.नि सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक जितेंद्र खैरनार, हवालदार संजय लक्ष्मण देवरे, कॉन्स्टेबल निलेश वाघ व चंद्रकांत पाटील यांच्या पथकाने केली.

Protected Content