यावल (प्रतिनिधी)। तालुक्यातील अट्रावल येथील संपुर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध असलेल्या श्री मुंजोबा यात्रेची मागील आठवड्यात सांगता झाली, पाच वार चाललेल्या या यात्रेत प्रचंड प्रमाणात लाखो भाविकांनी श्री मुंजोबाचे दर्शन घेतले. हे जागृत देवस्थान असुन सालाबादप्रमाणे या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते. या निमित्ताने दर्शनासाठी संपुर्ण महाराष्ट्र राज्यासह शेजारील मध्य प्रदेश राज्यातुन लाखो भाविक येत असतात. यावल शहरापासुन ८ किलोमिटर लांब असलेल्या या ठिकाणी जाण्यासाठी विशेष बससेवा येथील एस.टी. आगारातुन उपलब्ध करण्यात येत असते. यावर्षीही यावल आगारतुन यात्रेकरीता ३३० बसफेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. यातुन आगाराला ८३ हजार २८२ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
२०१८ या साली यात्रेकरीता सोडण्यात आलेल्या ८४ बस फेऱ्यांच्या माध्यमातुन ७० हजार ३५४ रूपये एवढे उत्पन्न मिळाले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी २४६ बसफेऱ्या आधिक असतांना देखील मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी उत्पन्नात घट झाल्याचे दिसून येत आहे, याला अवैध प्रवासी वाहकतुक जबाबदार असल्याचे निदर्शनास आले आहे. असे असले तरी आगामी यात्रेसाठी येथील आगारातून यात्रेकरूंसाठी चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचा विश्वास एस.टी. आगाराचे वरिष्ठ अधिकारी जयंत कुरंभट्टी यांनी ‘लाईव्ह ट्रेन्ड न्यूज’शी बोलताना व्यक्त केला.