यावल प्रतिनिधी | तालुक्यातील हिंगोणा येथील शिवारात झालेल्या दुहेरी हत्याकांडातील आरोपीची सबळ पुराव्याअभावी भुसावळ सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
या संदर्भात माहिती अशी की, २५ जुलै २०१७ रोजी हिंगोणा शिवारात जियाऊल हक इबादत अली यांचे शेतामध्ये मंगला दुर्गेश बारेला, दुर्गेश बारेला यांच्यावर एका अज्ञात आरोपीने हल्ला केला होता. त्यामध्ये मंगला बारेला हिचा जागीच मृत्यू झाला, तर सुमारे चार ते पाच दिवसांनंतर दुर्गेश बारेला याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात हे कृत्य गुरुलाल पांगा बारेला याने केल्याचे दिसून आले होते.
गुरूलाल पंगा बारेला याला अटक करून त्याच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. भुसावळ सत्र न्यायालयात या खटल्याचे कामकाज चालले. त्यात एकुण १० साक्षीदार तपासले गेले. आरोपीवर सरकार पक्षातर्फे युक्तीवाद केल्यानंतर सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी आरोपी गुरुलाल पांगा बारेला याची निर्दोष मुक्तता केली. आरोपी तर्फे ऍड. प्रफुल्ल आर. पाटील यांनी काम पाहिले. त्यांना ऍड.संजीव वानखेडे, ऍड.जया झोरे, ऍड.दुर्गेश लहासे यांनी सहकार्य केले.