

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बालपणी वडिलांचे बोट धरून आकाशात उडणाऱ्या विमानांकडे कुतूहलाने पाहणारी यावलमधील एका सामान्य कुटुंबातील मुलगी आज आकाशातच आपले करिअर घडवत आहे. कठोर परिश्रम, अपार जिद्द आणि ध्येयावर असलेली निष्ठा यांच्या जोरावर पायल नेवे हिने हवाई सुंदरी होण्याचे स्वप्न साकार केले असून, आज ती इंडिगो एअरलाइन्समध्ये लीड केबिन अटेंडंट म्हणून कार्यरत आहे. “तुम्ही कुठे शिकता यापेक्षा तुम्ही ध्येय गाठण्यासाठी किती आणि कसे शिकता हे महत्त्वाचे आहे,” असा संदेश देत तिने विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले.
यावल येथील अजय नेवे यांच्या कुटुंबात जन्मलेल्या पायल नेवे या तरुणीने आपले बालपण वडिलांच्या फोटोग्राफी व्यवसायात मदत करत घालवले. लहानपणी वडिलांसोबत बाहेर जाताना आकाशात उडणाऱ्या विमानांकडे पाहून कधीतरी आपणही त्यात बसू, अशी स्वप्ने ती रंगवत असे. मराठी माध्यमातून शहरातील बालसंस्कार शाळेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ती पहिल्यांदाच शहराबाहेर गेली.
इयत्ता बारावीला केवळ ६८.२० टक्के गुण असूनही पायलने हार मानली नाही. सन २०१७ मध्ये तिने मर्चंट नेव्हीमध्ये प्रयत्न केले आणि निवडही झाली; मात्र तेथे एकमेव मुलगी असल्याने तिने तो मार्ग बदलला. त्यानंतर इंटेरियर डिझायनिंगसाठी प्रयत्न करत विविध कोर्सेस केले. अनुभव आणि उपजीविकेसाठी मुंबईतील व्हीएफएस या व्हिसा कंपनीत तिने नोकरी सुरू केली आणि फेब्रुवारी २०१९ मध्ये फ्रान्स डिपार्टमेंटमध्ये कार्यरत झाली. २०२१ पर्यंत नोकरी करत असतानाच, अडीच वर्षांत तिने विविध मोठ्या एअरलाइन्समध्ये हवाई सुंदरी पदासाठी तब्बल सात वेळा मुलाखती दिल्या.
अखेर २०२२ मध्ये अहमदाबाद येथील इंडिगो एअरलाइन्समध्ये तिची निवड झाली. मुलाखतीसाठी आलेल्या २७० मुलींमधून केवळ ६ मुलींची निवड झाली होती, त्यात पायल नेवेचा समावेश होता. ३ मार्च २०२३ रोजी इंडिगोमध्ये हवाई सुंदरी म्हणून तिची निवड झाली आणि १६ मार्च २०२३ रोजी तिने पहिल्यांदाच विमानात सेवा देण्यास सुरुवात केली. सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर तिला नुकतीच पदोन्नती मिळून ती लीड केबिन अटेंडंट म्हणून रुजू झाली आहे.
हवाई सुंदरी म्हणून सुरुवातीला तिला देशांतर्गत उड्डाणांवर सेवा देण्याची संधी मिळाली. त्यानंतर १४ डिसेंबर २०२३ पासून तिची आंतरराष्ट्रीय विमान सेवेसाठीही निवड झाली. आजवर तिने जगभर प्रवास केला असून, वैमानिक सेवेतील महत्त्वाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहे.
आपल्या यशानंतरही पायलने जमिनीशी नाळ तुटू दिलेली नाही. सुट्टीवर यावलला आली की ती आजही वडिलांच्या झेरॉक्स आणि संगणकीय सेवा व्यवसायात मदत करताना दिसते. आपण कितीही मोठ्या पदावर असलो तरी कुटुंबाच्या व्यवसायात हातभार लावणे ही आपली जबाबदारी आहे, असे ती अभिमानाने सांगते.
नुकतीच तिने शिक्षण घेतलेल्या बालसंस्कार शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुख्याध्यापक अतुल गर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक एस. डी. देशमुख यांनी घेतलेल्या मुलाखतीत पायलने आपला खडतर यशप्रवास उलगडला. विद्यार्थ्यांनी कुतूहलाने तिचे मार्गदर्शन ऐकले, तर पायलने आपल्या शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
सामान्य परिस्थितीतून असामान्य यश मिळवणारी पायल नेवे आज यावलसह संपूर्ण परिसरातील तरुणींसाठी प्रेरणास्थान ठरत असून, आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी तिचा प्रवास नवा आत्मविश्वास देणारा आहे.



