यावल प्रतिनिधी । येथील परिसरात सद्या हिवतापाची साथ पसरली असुन ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ रुग्णांची मोठी गर्दी दिसून येत आहे. मात्र रुग्णालयात रुग्णांसाठी कोणत्याही प्रकारची सोयी-सुविधा नसल्यामुळे नागरिकांकडून आरोग्य विभागाच्या प्रशासकीय कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील ग्रामीण रुग्णालयात पावसाळा लागल्यापासुन विविध उपचारासाठी रुग्णांची प्रचंड संख्येत वाढ झाली आहे. ग्रामीण रुग्णालयात रूग्णांच्या सोयीसुविधांचा आभाव दिसुन येत नसल्याने शहरवासीयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच ग्रामीण रुग्णालयातील नाव नोंदणी कक्षात फार्म भरण्यासाठी मोठी रुग्णांची रांग लागलेली असून याठिकाणी साधा फॅनही नाही आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत असतात. त्याशिवाय महत्वाच्या ड्रेसींग खोलीला आणि वैद्यकीय अधिकारी भेट प्रतिक्षाव्दार जवळ नसल्याने देखील रुग्णांना त्रास सोसावा लागत आहे. रुग्णालयाच्या स्त्री कक्षातची इतकी वाईट अवस्था आहे की, या कक्षात दुर्गंधीचा नेहमीच वास येत असल्याने त्या महिला उपचारासाठी दाखल त्यांची काय अवस्था होत असेल हे आपण कल्पना न केलेलेच बरे, याशिवाय अधिकारी वगळता कर्मचारी आणि रुग्णांसाठी पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याची रुग्णांची ओरड आहे. सर्व पार्श्वभुमीवर यावलचे ग्रामीण रुग्णालयाची अवस्थाही एखाद्या प्राथमिक आरोग्य केंद्रापेक्षाही वाईट असल्याचे चित्र आहे. या सर्व रुग्णांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांकडे आरोग्य प्रशासना तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी रुग्णांकडुन करण्यात येत आहे.