यावल प्रतिनिधी । आज ३ डिसेंबर रोजी साजरा होणार्या जागतिक दिव्यांग दिनाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेने शहरातील अपंगांना त्यांच्या बँक खात्यात थेट पाच लाख रुपयांची तरतूद करुन नगदी अनुदान वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निधीतून तब्बल १७८ दिव्यांग बांधवांना लाभ देण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार दिव्यांगांसाठी स्व. निधीतील ५ टक्के निधी राखीव ठेवून त्याचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती नगर परिषदचे मुख्यधिकारी बबन तडवी यांनी दिली आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने या संदर्भात नगर पालिकांना आदेश दिले आहेत. पालिकांनी स्व. निधीतील ५ टक्के निधी राखीव ठेवावा तसेच तो निधी दिव्यांगाकरिता खर्च करावा असे आदेशात म्हटले आहे.
शहरातील दिव्यांगांचे सर्वेक्षण करून त्यांच्याकडून दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, बँक खात्यासह आधार संबंधित माहिती संकलित केली. त्यानुसार एकूण १७८ दिव्यांगांची नोंद पालिकेत करून त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. आता लवकरच त्यांच्या बँक खात्यात थेट मदतीचे अनुदान वितरित केले जाणार आहे. या संदर्भातील संपुर्ण तयारी नगर परिषदचे संबंधीत अधिकाऱ्यांकडून केली जात आहे.