यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । सध्या महाराष्ट्राच्या स्थानिक बाजारपेठेत केळीला चांगला भाव मिळत नसून काही शेतकरी नियोजनबद्ध पद्धतीने दर्जेदार केळीचे उत्पादन घेऊन परदेशात निर्यात करण्यात यशस्वी होत आहेत. त्यामुळे परदेशात केळीला मागणीत वाढ होत असल्याने शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
केळी लागवड करणे हे आजच्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी आतबट्टीचा व्यवसाय असल्यासारखे आहे. केळी उत्पादन दर्जेदार होऊनही जाहीर बाजारभाव दरानुसार केळीला दर मिळेलच याची खात्री नाही. त्यातच नैसर्गिक नुकसान हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने दुष्काळात तेरावा महिना असते. अशातच काही शेतकरी मात्र यास अपवाद ठरून नियोजनबध्द पध्दतीने दर्जेदार केळी उत्पादन करून ती विदेशात रवाना करण्यात यशस्वी ठरत आहेत.
प्रगतशील शेतकरी- किशोर देवराम राणे
येथील शहरातील प्रगतशील शेतकरी किशोर देवराम राणे यास अपवाद ठरले आहेत. राणे यांनी जी९ या जातीचे केळीचे वाण लावून कोल्हापूर येथील पोलन ऍग्रो या कंपनीचे प्रतिनिधी मार्फत नियोजन पद्धतीने केळीची पाच बाय सहा या गाळ्यावर लागवड करून त्यांची आज दर्जेदार केळी उत्पादन होऊन त्यांच्या केळीस विदेशात इराण येथे मागणी आहे. आज त्यांचे शेतातून सुमारे वीस टन केळी कापणी होऊन ती इराणसाठी रवाना करण्यात आली. पोलनअग्रो व धरती कृषी संवर्धन यांचे मार्फत सदरची केळी निर्यात केली जात आहे.
पोलन अग्रो या कंपनीने तालुक्यात यावलसह,पिळोदा, साकळी, डांभुर्णी, न्हावी येथे काही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून दर्जेदार केळीची लागवड केली असून या शेतकऱ्यांची देखील केळी भावी काळात विदेशात निर्यात करण्याचे कंपनी प्रतिनिधींचे उद्दिष्ट आहे. राणे यांनी २५ हजार केळी खोडाची लागवड केली असून आज प्रथमच त्यांची केळी इराणला निर्यात झाली आहे.
विशेष म्हणजे त्यांच्या दर्जेदार केळीस तेराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे त्यांना दर मिळणार आहे. पोलन अॅग्रो तर्फे तालुक्यात सुमारे ७५ हजार केळी लागवड झाली असून संबंधित कंपनीतर्फे शेतकऱ्यांना केळी लागवडीपासून ते कटाईपर्यंत मोफत मार्गदर्शन मिळत आहे. त्यामुळेच शेतकरी दर्जेदार केळी उत्पादन करून विदेशात केळी निर्यात करु शकत आहे. शेतकरी मित्रांनी बदलत्या हवामानानुसार पारंपारीक पिके न घेता शेती उत्पादित माल निर्यातवर भर देण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन घ्यावे. व निर्यातक्षम उत्पादित शेतीमाल तयार करून आपला विकास साधावा.
पोलन अॅग्रो प्रतिनिधी -अंकुश जाधव
शेतकऱ्यांनी कोणत्याही संकटांना न घाबरता शेतीची कास धरत दर्जेदार निर्यातक्षम केळी लागवडीसाठी संपूर्ण मार्गदर्शन करुन त्यांना सक्षम बनविण्याचा उद्देश आहे.