शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जिल्ह्यात यात्रा : रविकांत तुपकर

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शेतकऱ्यांच्या हक्काचा पीकविमा, सोयाबीन-कापूस भावफरक, नाफेडमध्ये अडकलेली शेतकऱ्यांची रक्कम, रखडलेले अनुदान, शेतीला कंपाउंड यासह इतर मागण्यांसाठी आठवडाभरात जिल्हाभर मोठी यात्रा काढणार असल्याची घोषणा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. सरकारवर दबाव वाढवून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आता रस्त्यावरची लढाई लढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक २५ फेब्रुवारी रोजी बुलढाणा येथील शिवगड हॉटेलमध्ये पार पडली. या बैठकीस मोठ्या संख्येने शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. विधानसभेच्या निवडणुकीनंतर आयोजित झालेल्या या पहिल्या बैठकीला मोठा उत्साह पाहायला मिळाला. अनेक नव्या कार्यकर्त्यांनी संघटनेत प्रवेश केला तसेच आपल्या भूमिका मांडल्या.

रविकांत तुपकर म्हणाले की, “माझा पिंडच चळवळीचा आहे, त्यामुळे मी कधीच निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही. गेल्या २२ वर्षांपासून शेतकरी चळवळीत कार्यरत असून, शेतकरी आणि कष्टकरी जनतेसाठी मी लढत राहणार आहे.” शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी जिल्हाभर यात्रा काढल्यानंतर मुंबईकडे कुच करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तुपकर यांनी सांगितले की, महाराष्ट्रात शेतकरी चळवळी क्षीण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत क्रांतिकारी शेतकरी संघटना नव्या जोमाने कार्यरत होईल. “शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रत्येक कार्यकर्त्याने रस्त्यावर उतरले पाहिजे. गावोगावी फिरा, शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घ्या आणि त्यांचे समाधान करा,” असे त्यांनी आवाहन केले.

शासनाने रखडलेला पीकविमा दिला नाही, सोयाबीन आणि कापसाला योग्य दर मिळत नाही, अशा परिस्थितीत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यासाठी संघटनेत व्यावसायिक आघाडी स्थापन केली जाईल. याअंतर्गत मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये कार्यरत राहणारी पाच सदस्यांची टीम गठीत केली जाणार आहे, जी शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल.

काही प्रस्थापित नेते शेतकरी चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रयत्नांना निष्फळ करण्यासाठी नवे नेतृत्व आणि वक्ते घडवण्यावर भर दिला जाणार आहे. संघटनेच्या माध्यमातून विविध शिबिरे आयोजित केली जातील तसेच शेतकरी कार्यकर्त्यांचे कौटुंबिक संमेलनही घेतले जाणार असल्याचे तुपकर यांनी स्पष्ट केले.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेची राज्यस्तरीय बैठक ३ मार्च रोजी पुण्यात होणार आहे. या बैठकीत राज्यभरातील संघटनात्मक नियुक्या केल्या जाणार आहेत. रखडलेला पीकविमा, निवडणुकीपूर्वी दिलेले कर्जमाफीचे आश्वासन, सोयाबीन व कापूस खरेदी नाफेड आणि सीसीआयने अपूर्ण ठेवली असल्याने, यासाठी प्रति क्विंटल ३,००० रुपये भाव फरक अनुदान देण्याची मागणी केली जाणार आहे. राज्यव्यापी आंदोलनाची पूर्वतयारीही या बैठकीत केली जाणार आहे.

शेतकरी संतोष सानप यांच्यावर अफू पीक घेतल्याने कारवाई करण्यात आली. यावर बोलताना तुपकर म्हणाले, “शासनाने शेतकऱ्यांनी हे पीक का घेतले, याचा विचार करावा. खसखसचा उपयोग अन्न व औषधनिर्मितीमध्ये केला जातो. मध्यप्रदेश व राजस्थानमध्ये शेतकऱ्यांना यासाठी परवानगी आहे, मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना का नाही?” शेतकऱ्यांना अफू आणि खसखस पीक घेण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. या बैठकीला क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनेच्या पुढील आंदोलनाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

 

Protected Content