Home Uncategorized पातोंडासह पंचक्रोशीत उद्यापासून यात्रोत्सव

पातोंडासह पंचक्रोशीत उद्यापासून यात्रोत्सव


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे असलेल्या पातोंडा गावाची तसेच पंचक्रोशीतील मठगव्हाण, रुंधाटी, गंगापुरी, मुंगसे, खापरखेडा, सावखेडा, दापोरी, नांद्री, खेडी, खवशी, दहिवद आदी गावांची ग्रामदैवत म्हणून श्री लघुमाहिजी देवीची मान्यता आहे. पातोंडा–मठगव्हाण रस्त्यावर गावाच्या वेशीवर असलेल्या श्री लघुमाहिजी देवीच्या मंदिरात दरवर्षी पौष शुद्ध चतुर्दशीपासून यात्रोत्सव भरतो. यंदाही उद्यापासून (ता. ६ जानेवारी) आठवडाभर हा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

काल देवीचा पालखी सोहळा टाळ-मृदंगांच्या गजरात संपूर्ण गावातून भक्तिमय वातावरणात पार पडला. यात्रोत्सवाच्या काळात परिसरातील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेले भाविकही यात्रेनिमित्त गावात दाखल होत असून लहान बालके, तरुण-तरुणी, महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी दिसून येते.

गावाच्या उत्तरेस उंच कळस असलेले लघुमाहिजी देवीचे भव्य व पुरातन मंदिर आहे. अखंड दगडावर कोरीव सिंहावर आरूढ असलेली देवीची भव्य मूर्ती येथे विराजमान असून ही देवी सप्तशृंगी देवीचे प्रतिरूप मानली जाते. खान्देशात या देवस्थानाला विशेष महत्त्व आहे.

प्राचीन काळी मंदिराच्या जागेवर मोठा वडाचा वृक्ष होता. त्या ठिकाणी उदासी महाराजांची पर्णकुटी होती. शेतकाम करताना एका शेतकन्याला त्रिशूळाच्या आकाराचे तीन दगडी बाण सापडल्याची आख्यायिका आहे. सप्तशृंगी देवीच्या सात बहिणींमध्ये सर्वात लहान असलेली देवी ‘माहिजी’ म्हणून ओळखली जाऊ लागली व ‘लघुमाहिजी’ हे नाव प्रचलित झाले, अशी माहिती देवस्थानाचे सेवेकरी कृष्णा गालापुरे यांनी दिली.

देवीच्या मंदिरासाठी कै. भिकारी शेटे यांनी जमीन दान केली, तर अमळनेरचे दानशूर प्रतापशेठजी यांनी सुंदर कळस असलेले मंदिर बांधून दिले. मंदिराच्या विकासात कै. जगन्नाथ वामनराव ठाकूर यांचेही मोठे योगदान राहिले. वंशपरंपरागत पूजाअर्चा दिवंगत रमेश गालापुरे करीत होते, सध्या त्यांचे सुपुत्र श्रीकृष्ण गालापुरे ही जबाबदारी सांभाळत आहेत.

आज मंदिराचा कायापालट झाला असून परिसर पेव्हर ब्लॉकने सुशोभित करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या सहकार्याने महाराष्ट्र शासनाने लघुमाहिजी देवस्थानास ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे.

यात्रोत्सवानिमित्त खाद्यपदार्थ व संसारोपयोगी वस्तूंची दुकाने थाटली जात असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होते. पौष शुद्ध चतुर्दशीला नवस फेडण्यासाठी भाविक देवीला वरण-रोडग्याचा नैवेद्य अर्पण करतात, तर पौर्णिमेला गुळाच्या शिर्‍याचा महाप्रसाद दिला जातो. रात्री लोकनाट्याचे कार्यक्रम तसेच देवीच्या मानार्थ प्रत्येक गल्लीतील तगतरावांची मिरवणूक हे यात्रेचे विशेष आकर्षण असते.


Protected Content

Play sound