पुणे, वृत्तसंस्था | छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत करणे चुकीचे असल्याचे मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केले आहे. राजे हे राजे आहेत त्यामुळे अशा गोष्टींना लगाम घालणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पुण्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गोखले म्हणाले, “मी मोदीभक्त नाही किंवा कोणत्याही राजकीय पक्षाशी सबंधित नाही. तसेच कोणाचाही झेंडा मी खांद्यावर घेतलेला नाही. त्यामुळेच या गोष्टी बोलतो आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांची मोदींसोबत तुलना करणे चुकीची आहे. राजे हे राजे आहेत. अशा गोष्टींना लगाम घातला पाहिजे.”
“राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार हे एकमेव व्हिजन असणारी व्यक्ती आहेत. ते कोणाच्याही कानात जाऊन मला ‘जाणता राजा म्हणा’ असे सांगणार नाहीत,” अशा शब्दांत विक्रम गोखले यांनी शरद पवार यांची या वादामध्ये पाठराखणं केली आहे.
दरम्यान, सावकरप्रकरणावरुन त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना सावरकर माहिती नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही. सावरकर देव नव्हे तर माणूस होते. गांधी आणि सावरकर यांची चूक होऊ शकते. तसेच ब्राह्मण समाजाला आरक्षण नको आम्ही आमच्या बुद्धीवर जगू, अशा शब्दांत त्यांनी ब्राह्मण आरक्षणाबाबत आपली भुमिका स्पष्ट केली.