कोल्हापूर, वृत्तसंस्था | महाराष्ट्राच्या रांगड्या मातीतले मल्ल म्हणून ओळख असलेल्या ‘रुस्तम ए हिंद’ दादू चौगुले यांचे रविवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. महाराष्ट्राच्या कुस्तीला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देण्यामध्ये चौगुलेंचा मोठा सहभाग होता. तीन दिवसांपूर्वी त्यांना धाप लागल्यामुळे कोल्हापुरातील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. यावेळी उपचारादरम्यान दादू कोमामध्ये गेले.
रविवारी दुपारी २.०० वाजण्याच्या सुमारास दादूंना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. १९७३ साली न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये चौगुले यांनी रौप्यपदकाची कमाई केली होती.
कोल्हापुरातील मोतीबाग तालमीत दादूंनी कुस्तीचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. १९७० साली दादूंनी ‘महाराष्ट्र केसरी’ हा मानाचा किताब पटकावला होता. यानंतर १९७३ सालीच दादूंनी ‘रुस्तम ए हिंद’ आणि ‘भारत केसरी’ असे दोन्ही किताब पटकावले होते. कुस्तीमधील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचा ध्यानचंद पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते.