Home राष्ट्रीय लक्षद्वीपमध्ये उभारला जातोय जगातील पहिला हायब्रीड ऊर्जा प्रकल्प

लक्षद्वीपमध्ये उभारला जातोय जगातील पहिला हायब्रीड ऊर्जा प्रकल्प


कवरत्ती-वृत्तसेवा | चारही बाजूंनी समुद्राने वेढलेल्या बेटांसाठी पिण्याच्या गोड्या पाण्याची उपलब्धता आणि स्वस्त व स्थिर ऊर्जेचा पुरवठा ही दोन मोठी आव्हाने असतात. मात्र आता लक्षद्वीपमधील या दोन्ही समस्यांवर समुद्रच उपाय ठरणार आहे. राजधानी कवरत्ती येथे असा एक अभिनव प्रकल्प उभारला जात आहे, जो समुद्रातील तापमानातील फरकाचा वापर करून वीज निर्माण करेल आणि त्याच प्रक्रियेत समुद्राच्या पाण्याचे पिण्याच्या गोड्या पाण्यात रूपांतर करेल.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी (NIOT) या संस्थेने या क्रांतिकारी तंत्रज्ञानावर काम सुरू केले असून हा प्रकल्प वर्षाच्या अखेरीपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे हा जगातील पहिला असा हायब्रीड प्रकल्प असेल, जो समुद्रातील उष्णता वापरून २४ तास वीज निर्माण करेल आणि त्याचबरोबर शुद्ध पिण्याचे पाणी देखील तयार करेल.

हा प्रकल्प ओशन थर्मल एनर्जी कन्व्हर्जन (OTEC) या तंत्रज्ञानावर आधारित आहे. या पद्धतीमध्ये समुद्राच्या पृष्ठभागावरील गरम पाणी आणि खोल समुद्रातील अतिशय थंड पाणी यांमधील तापमानातील फरकाचा उपयोग केला जातो. गरम पाणी व्हॅक्यूममध्ये टाकून त्यापासून वाफ तयार केली जाते. ही वाफ टर्बाइन फिरवून वीज निर्माण करते. त्यानंतर खोल समुद्रातून आणलेल्या थंड पाण्याने ही वाफ थंड केली जाते आणि त्यातून गोडे पाणी तयार होते.

या नवीन प्रकल्पाद्वारे दररोज सुमारे १ लाख लिटर गोडे पाणी तयार होणार आहे. तसेच या प्लांटला चालवण्यासाठी स्वतंत्र डिझेल किंवा बाहेरील विजेची गरज भासणार नाही, कारण आवश्यक वीज ही प्रकल्प स्वतःच निर्माण करणार आहे.

सध्या लक्षद्वीपमधील आठ बेटांवर लो टेम्परेचर थर्मल डीसॅलिनेशन (LTTD) तंत्रज्ञानाद्वारे समुद्राच्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर केले जाते. या प्रक्रियेत समुद्राचे पाणी वाफवून नंतर थंड करून पिण्याचे पाणी तयार केले जाते. मात्र हे प्लांट चालवण्यासाठी डिझेल जनरेटरद्वारे वीज द्यावी लागते. विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी या नव्या प्रकल्पाला भविष्यातील ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले आहे.

या प्रकल्पाचा सर्वात आव्हानात्मक भाग म्हणजे खोल समुद्रातून थंड पाणी वर आणण्याची प्रक्रिया. यासाठी सुमारे ३.८ किलोमीटर लांबीची आणि ९०० मिमी व्यासाची हाय डेन्सिटी पॉलीएथिलीन पाइपलाइन समुद्राच्या तळाशी बसवली जात आहे. ही पाइपलाइन समुद्राच्या सुमारे १००० मीटर खोलीतून बर्फासारखे थंड पाणी वर आणेल. कवरत्तीच्या खाडी परिसरात या पाइपलाइनचे वेल्डिंग करून ती समुद्रात बसवण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे.

सध्या लक्षद्वीपमधील वीजपुरवठा मोठ्या प्रमाणावर डिझेल जनरेटरवर अवलंबून आहे. मुख्य भूमीवरून जहाजांद्वारे डिझेल आणावे लागते, जे महागडे असून सागरी पर्यावरणासाठीही धोकादायक ठरते. साधारण डीसॅलिनेशन प्लांट चालवण्यासाठी सुमारे ५५ मेगावॅट वीज लागते, जी सध्या डिझेलवर अवलंबून आहे.

मात्र कवरत्तीतील हा नवीन प्रकल्प दररोज ६५ मेगावॅटपर्यंत वीज निर्माण करण्याची क्षमता ठेवणार आहे. विशेष म्हणजे संपूर्ण लक्षद्वीपला दररोज फक्त १० ते १२ मेगावॅट वीज लागते. त्यामुळे हा प्रकल्प स्वतःची गरज भागवण्याबरोबरच इतर बेटांना देखील अतिरिक्त स्वच्छ ऊर्जा पुरवू शकणार आहे.


Protected Content

Play sound