नवी दिल्ली वृत्तसंस्था । जम्मू-काश्मिरातील पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
अमेरिका व इस्त्राईलसह देशातील अनेक देशांनी पुलवामा येथील हल्ल्याचा निषेध केला आहे. इस्त्राईलने याचा निषेध करून आपण दहशतवादाच्या निर्मुलनासाठी भारताची साथ करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेनेही जैश-ए-मोहंमदच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करून भारतासोबत असल्याचे प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसरीकडे पाकनेही याचा वरकरणी निषेध करून या हल्ल्यात आपला कोणत्याही प्रकारचा हात असल्याचा साफ इन्कार केला आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने मात्र यासाठी पाकला धारेवर धरले आहे. सरकारतर्फे जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय की, हा हल्ला पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने केला आहे. आंतरराष्ट्रीय हदशतवादी मसूद अझरच्या नेतृत्वाखालील दहशतवादी गटाने हा हल्ला केला. अझरला त्याचं अतिरेकी कारवायांचं जाळं मजबूत करण्यासाठी आणि भारतावर हल्ले करण्यासाठी पाकिस्तान सरकारने पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी सर्वतोपरी उपाय करण्यास भारत सरकार कटिबद्ध आहे. याचसोबत आम्ही दहशतवादाविरोधातला लढाही सुरू ठेवणार आहेत. आम्ही पाकिस्तानकडे मागणी करतो की त्यांनी दहशतवादी आणि अतिरेकी गटांना मदत करणं थांबवावं आणि त्यांच्या प्रदेशातून दहशतवाद्यांना मिळणारी रसद थांबवावी, इतर देशांमध्ये हल्ले करण्यासाठी त्यांना मिळणारी शस्त्रास्त्रे, दारुगोळा नष्ट करावा. यासोबत आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाच्या सर्व सदस्यांना असे आवाहन करतो की जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे अशी अपेक्षादेखील सरकारने व्यक्त केली आहे.