धानोरा (प्रतिनिधी) व्यसनाने शरीराचा ऱ्हास होतो, त्यासोबत कुटुंबाचे, समाजाचे स्वास्थ्य देखील खराब होते म्हणून विद्यार्थी दशेपासूनच व्यसनांपासून दूर रहा असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी केले. ते अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
२६ जून हा दिवस जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो. यानिमित्ताने आदर्श क्लासेसमध्ये अडावद पोलीस स्टेशनतर्फे अमली पदार्थ विरोधी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी श्री. पवार पुढे म्हणाले की, विद्यार्थी जीवनात वाचन व खेळणे हे दोन व्यसने अंगी बाळगल्याने तुमच्या जीवनाचे कल्याण होईल. समाजाची निकोप वाढ व्हावी यासाठी तरुणांनी व्यसनांपासून दूर रहावे असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक गजानन राठोड, विकासोचे चेअरमन अनिल देशमुख, पी. आर. माळी, आदर्श क्लासचे संचालक पी.के. राणे उपस्थित होते.