यावल येथे ‘हिरकणी नव उद्योजक महाराष्ट्राची’ कार्यशाळा संपन्न

81bd99df af54 423b 8141 e7207297a834

यावल, प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान, कौशल्य विकास उद्योजकता विभाग यांच्यावतीने शहरात आयोजित ‘हिरकणी नव उद्योजक महाराष्ट्राची’ या अभियानांतर्गत एकदिवसीय महिला बचत गटांची कार्यशाळा पार पडली.

 

येथील पंचायत समितीच्या सभागृहात आज (दि.२३) सकाळी ११.०० वाजता ही कार्यशाळा घेण्यात आली. या महिला बचत गट एकदिवसीय कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार जितेन्द्र कुवर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन पंचायत समितीच्या सभापती सौ. पल्लवी पुरुजीत चौधरी, उपसभापती उमाकांत रामराव पाटील, जिल्हा परिषद सदस्या सविता अतुल भालेराव, पं.स. सदस्य योगेश भंगाळे, सरफराज तडवी, कलीमा सायबु तडवी, पी.सी. सपकाळे, निर्मला पाटील, येथील उद्योजक शशीकांत बेहडे यांच्यासह तालुक्यातील विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. अभियानाचे तालुका व्यवस्थापक किरण पाटील व तहसीलदार जितेन्द्र कुवर यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत तालुक्यातील संपुर्ण १७८ बचत गटांच्या महिला सदस्या मोठया संख्येत सहभागी झाल्या होत्या. या बैठकीसाठी प्रत्येक तालुक्यातुन १० बचत गटांची निवड करण्यात येणार असुन या गटांना ५० हजार रुपये प्रमाणे बक्षीस म्हणुन शासनाकडुन मिळणार आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा पातळीवर जिल्घातुन १५० बचत गटांमधुन ५० उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बचत गटांची निवड करण्यात येवुन यात निवडण्यात आलेल्या गटाला प्रत्येकी दोन लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे. या साठी बचत गटाचे कार्यकाळ किमान एक वर्ष असावे अशी माहितीही किरण पाटील यांनी दिली. या कार्यशाळेचे प्रस्तावीक प्रभारी गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांनी केले तर सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी दिपक संदानशिव यांनी केले.

Protected Content