भुसावळ (वृत्तसंस्था) आज शेती, शिक्षण, संरक्षण, आरोग्य, आपत्कालीन व्यवस्थापन, दूरसंचार, टीव्ही, हवामानाचा अंदाज या सगळ्या क्षेत्रात घडत असलेली क्रांती अंतराळातून मिळणाऱ्या मदतीशिवाय शक्यच नाही. विकासाचा मार्ग अंतराळातून जातो, त्यामुळेच डि.आर.डि.ओ., इस्रो, अवकाश तंत्रज्ञान, सॅटेलाईट व टेलिकॉम क्षेत्रातील संशोधनाच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्या आहेत. ह्या संधीचे सोने करीत भावी अभियंत्यांनी भारताचे नाव लौकिक करावे, असे मार्गदर्शन प्रा.नीता नेमाडे यांनी विद्यार्थ्यांना केले.
“मिशन शक्ती, एमिसॅट व टेलिकॉम क्षेत्रातील संशोधनाच्या सुवर्ण संधी” विषयावर आज (३ एप्रिल) श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागात आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या. मागील आठवड्यात पार पडलेल्या क्षेपणास्त्रे, उपग्रह व अंतराळ क्षेत्रात झालेल्या विशेष घडामोडींची माहीती देण्यासाठी विभागातर्फे कार्यशाळा घेण्यात आली. मिशन शक्ती व एक एप्रिलला सोडलेला एमीसॅटच्या कार्य पद्धतीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
विद्यार्थ्यांना तीन छोट्या सत्रात सॅटेलाईट व टेलिकॉम विषयाच्या तीन तज्ञांनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात प्रा.दिपक खडसे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, पीएसएलवी सी-४५च्या मदतीने इलेक्ट्रॉनिक्स इंटेलीजेंस उपग्रह एमिसॅटला लॉन्च केले गेले आहे. ७४९ किलोग्रामचा हा उपग्रह डीआरडीओला डिफेंस रिसर्चमध्ये मदत करेल. भविष्यातील युद्धे ही जमीन, पाणी आणि हवेसह अवकाशातही लढली जातील असे मानले जाते. दैनंदिन जीवनासोबत लष्करासाठीही उपग्रह अत्यंत महत्त्वाचे असतात. शेवटच्या सत्रात प्रा.सुलभा शिंदे यांनी सांगितले की, भारतीय वैज्ञानिकांच्या बुद्धिमत्तेमुळे टेलिकॉम व अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात प्रगत देशांच्या तोडीस तोड आपली प्रगती झाली आहे. आता भारताने जे यश जागतिक पातळीवर प्राप्त केले आहे ते भावी पिढीला प्रेरक आहे.
या कार्यशाळेला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकॉम विभाग प्रमुख डॉ.गिरीष कुलकर्णी, प्रा.अनंत भिडे, प्रा.सुलभा शिंदे, प्रा.धिरज अग्रवाल, प्रा.नीता नेमाडे, प्रा.गजानन पाटील, प्रा.दिपक खडसे, प्रा.संतोष अग्रवाल, प्रा.निलेश निर्मल, प्रा.स्मिता चौधरी, प्रा.धिरज पाटील, श्री.नितीन पांगळे, श्री. विजय विसपुते, श्री. रोहित निर्मल उपस्थित होते.