चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील करंजगाव येथील जिजाई सेंद्रीय शेती फर्मच्या विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर रूरल डेव्हलपमेंट सेंटर येथे रविवारी सकाळी शेती विषयक कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी पुरस्कार प्राप्त शेतकरी तथा राहुरी विद्यापीठातील फार्म इन्कम डब्लिंग समितीचे सदस्य तुकाराम पाटील यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी पारंपरिक पद्धतीने उदघाटन न करता वृक्षास पाणी देऊन उदघाटन करण्यात आले. तर सत्कार समारंभात लोककल्याणकारी बळीराजा हे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. मार्गदर्शनपर भाषणात बोलताना तुकाराम पाटील यांनी सेंद्रिय शेती कशी करावी? उत्पादन खर्च कमी करून उत्पादन कसे वाढेल? याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. यात गांडूळ खत, निंबोळी खत, अर्क सोबतच जोडव्यवसाय म्हणून शेतीपूरक शेळीपालन, कुक्कुटपालन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कसा करावा हे सांगितले. सुभाष पाटील यांनी सेंद्रीय शेतीचे महत्त्व सांगितले. विषमुक्त अन्नाची जागतिक पातळीवर प्रचंड मागणी आहे. सेंद्रीय शेती फळभाज्या, पालेभाज्या विक्रीसाठी शासनाने व्यापारी संकुलात गाळा उपलब्ध करून द्यावा, अशी यावेळी करण्यात आली.
विचारपीठावर धनराज पाटील हे अध्यक्षस्थानी होते. तर उद्घाटन उपसरपंच नारायण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रस्तावना प्रा.गौतम निकम यांनी केली. आभारप्रदर्शन परमेश्वर पाटील यांनी मानले. यावेळी पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते. यात सुभाष पाटील, तुकाराम पाटील, किसन पवार, पृथ्वीराज राठोड, पंडित मोरे, भाऊसाहेब पाटील, योगेश जगताप, सुपडू चव्हाण, मनोज बोडखे, कल्याण दराडे,शेखर गांगुर्डे, अमोल मोरे, दत्तू सावळे, अनिल मोरे,मधुकर शेवाळे, किशोर कासार, अरविंद तोंडे, सूर्यनारायण पाटील, प्रकाश सानप आदींचा समावेश होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिजाई सेंद्रिय शेती फर्म यांनी परिश्रम घेतले.