अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य विद्या प्राधिकरणाच्या समता विभागा अंतर्गत सुरू असलेल्या आणि जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यवसायीक संस्थेतर्फे जळगाव येथे दोन टप्प्यात बालरक्षक कार्यशाळा हॉटेल रिगल पॅलेस येथे उत्साहात पार पडली.
यावेळी जिल्हा बालरक्षक समन्वयक प्रा.शैलेश पाटील यांनी समारोप सत्रात बोलतांना बालरक्षक चळवळ व्यापक होत असून आपण सर्व त्याचे साक्षीदार आहोत, आता सर्व प्रशिक्षणार्थीनी ह्या कार्यात झोकून देऊन काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
या कार्यशाळेत जिल्ह्यातील १०४ प्रशिक्षणार्थीपैकी पहिल्या टप्प्यात ४८ आणि दुसऱ्या टप्प्यात ५२ बालरक्षक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी विभागीय सुलभक म्हणून मनोज चिन्चोरे (पारोळा) आणि सुरेंद्र बोरसे (अंचळगाव, तांडा ता.भडगाव) यांनी आपली भूमिका पार पाडली. प्रशिक्षणात समता-समानता व बालरक्षक भुमिका व कार्य, विविध घटकांची माणसिकता, शाळाबाह्य मुलांसंदर्भात विविध आव्हाने, प्रवाहाबाहेरील विद्यार्थ्यांना सामावून घेतांना, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, अध्ययन शैली, मुक्त विद्यापीठ या विषयावर चित्रफिती व गटकार्य या माध्यमातून विषयाची सखोल मांडणी केली.
प्राचार्य डॉ. गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिव्याख्याता शैलेश पाटील यांनी उत्कृष्ट नियोजन करून सुलभकांच्या सहायाने कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडली. प्रा.शैलेश पाटील, सर्व सुलभक व सर्व बालरक्षक शिक्षकांनी प्रशिक्षणानंतर सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सौ.कल्पना दिलीप पाटील यांनी महिला बालरक्षक भगिनींना पुष्प व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जुगल ठाकरे यांनी केले.