भंडारा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील चिखला येथील मॉईलच्या माईन्समध्ये मॅगनीजच्या मलब्याखाली दबून एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू झालाय. चेतन शिवने (रा. चिखला वस्ती) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या अपघाताला मॉईलच्या मालकाला मृतकाच्या कुटूंबियानी जबाबदार धरले आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.संतप्त कुटुंबीयांनी मृतकाच्या पत्नीला आर्थिक मोबदला आणि नोकरीत सामावून घेण्याची मागणी केली आहे.
जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही, तसेच लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मृतदेह मॉईल माईन्स कार्यालयासमोरच ठेवण्यात येणार असल्याचा निर्धार संतप्त कुटुंबीयांनी घेतला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांनी पुढाकार घेत माईन्सच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी माईन्स प्रशासनानं कुटुंबीयांना 21 लाख रुपयांची आर्थिक मदत, कंत्राटदाराकडून एक लाख रुपयांची मदत, तसेच मृतकाच्या पत्नीला माईन्सच्या शाळेत नोकरी तथा मुलांना बाराव्या वर्गापर्यंत मोफत शिक्षण देण्याचं लेखी आश्वासन माईन्स प्रशासनानं दिले आहे. त्यामुळे आता संतप्त कुटुंबीयांनी मृतदेह कार्यालयासमोरून मृतदेह उचलून नेत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.